अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या २००२ मधील खूनप्रकरणी आरोपींना निर्दोष सोडून दिल्याबाबत अमेरिकेने संतप्त भावना व्यक्त केल्या असून पाकिस्तानने यातील कायदेशीर पर्यायांचा वेगाने विचार करावा. अल कायदाचा दहशतवादी असलेला आरोपी ओमर सईद शेख व इतरांवर खटले भरण्याची परवानगी अमेरिकेला द्यावी, तरच डॅनियल पर्ल या अमेरिकी पत्रकाराच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल असे म्हटले आहे.

पर्ल हे ‘दी वॉल स्ट्रीट जर्नल’च्या दक्षिण आशिया विभागाचे प्रमुख होते व इस्लामी दहशतवादी गटांबाबत वार्ताकन करण्यासाठी पाकिस्तानात आले होते. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय व ११ सप्टेंबर २००१ मधील हल्ला यांचा संबंध शोधण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्या वेळी त्यांचे कराचीतून अपहरण करण्यात आले व नंतर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला होता.

अल कायदाचा जन्माने ब्रिटिश असलेला दहशतवादी शेख व इतर आरोपींना निर्दोष सोडण्याच्या विरोधातील आव्हान याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती.

शेख व इतर आरोपींची सुटका करण्याचा आदेशही दिला होता. पाकिस्तानी न्यायालयाचा हा निकाल म्हणजे न्यायाची क्रूर थट्टा आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने शेख  व इतर तीन आरोपींना सर्व आरोपातून मुक्त केले असून त्यांची तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले आहेत.