बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्तारूढ अवामी लीग सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासंबंधीचे वृत्त खोडसाळपणाचे असून त्या कटात आपला कोणताही सहभाग नाही, असे स्पष्टीकरण येथील अमेरिकी दूतावासाने गुरुवारी दिले.
  हसीना यांचे सरकार पदच्युत करण्याचा अमेरिकी गुप्तचर संस्थांनी कट रचला असल्याचे वृत्त भारतीय गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने येथील स्थानिक माध्यमांनी प्रसृत केले होते. अमेरिकेच्या येथील दूतावासाने या वृत्ताचे स्पष्टपणे खंडन केले.
‘हसीना यांना हटविण्यासाठी अमेरिकेची व्यापक कारवाई’ हे ‘बीडीन्यूज-२४.कॉम’ या खासगी संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले वृत्त अतिरंजित असून त्यात जराही सत्याचा अंश नाही, असे येथील अमेरिकी दूतावासाच्या प्रवक्त्या मोनिका शाइ यांनी येथे सांगितले.
अमेरिकी निधी घेऊन शेख हसीना यांचे सरकार उलथविण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून त्याचबरोबर त्रिपुरा भागातील डाव्यांची चळवळही दुबळी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आपल्याला आढळले आहे, असा गौप्यस्फोट सदर वृत्ताद्वारे करण्यात आला होता.
‘बळकट द्विपक्षीय संबंध’
ढाका आणि वॉशिंग्टन यांच्यात दृढ मैत्री असून विविध मुद्दय़ांवर त्यांचे व्यापक सहकार्य आहे, असेही शाइ यांनी स्पष्ट केले.
दहशतवादविरोधी लढा, उभयतांमध्ये व्यापारी संबंध दृढ करणे, आदी मुद्दय़ांवर आमचे मतैक्य असून आमचे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचाही प्रयत्न आहे, असे त्या म्हणाल्या.