आयसीस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल-बगदादी याचा खात्मा झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली. सीरियात अमेरिकेच्या विशेष लष्करी दलांनी केलेल्या गुप्त कारवाईदरम्यान एका भुयारात आत्मघाती स्फोटात ठार झाल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. त्यानंतर, ट्रम्प यांनी अमेरिकी लष्कराच्या एका प्रशिक्षित श्वानाचा फोटो शेअर केला असून, “बगदादीला शोधण्यात आणि ठार मारण्यात याने महत्त्वाची भूमिका निभावली” असं म्हणत त्या श्वानाचं कौतुक केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र या श्वानाचं कौतुक होत आहे.

बेल्जिअन मालिनोस जातीच्या या कुत्र्याचं नाव मात्र ट्रम्प यांनी जाहीर केलेलं नाही. अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर बेल्जिअन मालिनोस जातीच्या कुत्र्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. लादेनचा शोध घेण्यात या श्वानांची मोठी मदत झाल्याचं सांगितलं जातं.

असा ठार झाला बगदादी –

‘इस्लामिक स्टेट’चा (आयसिस) म्होरक्या अबु बकर अल् बगदादी वायव्य सीरियात अमेरिकेच्या विशेष लष्करी दलांनी केलेल्या गुप्त कारवाईदरम्यान एका भुयारात आत्मघाती स्फोटात ठार झाल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केली. निर्दयी ‘इस्लामिक स्टेट’चा म्होरक्या आणि जगातला पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी कुत्र्यासारखा आणि भित्र्यासारखा मारला गेला, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी बगदादी ठार झाल्याची घोषणा करताना व्यक्त केली.‘आयसिस’चा म्होरक्या बगदादी आत्मघाती स्फोट घडवण्यापूर्वी रडत आणि किंचाळत होता. त्याने आपल्या तीन मुलांनाही ठार केले, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

अब्दुला कर्दाशकडे आयसीसचे नेतृत्त्व –

इस्लामीक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला ठार मारल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या दुसऱ्या हल्ल्यात अबू हसन अल मुजाहीर हाही ठार झाल्याचा दावा सिरियातील लष्कराने व सिरियातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. आयसीस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी व मुजाहीर हे ठार झाल्यानंतर अब्दुल्ला कर्दाश याच्याकडे आयसीसचे नेतृत्त्व आले आहे. कर्दाश हा इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैन याच्या सैन्यदलात अधिकारी होता. कर्दाशची ओळख प्राध्यापक अशी असून तो पूर्वी आयसीसचे दररोजचे कामकाज सांभाळायचा. ऑगस्ट महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी कर्दाशकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. कर्दाश हा बगदादीच्या अतिशय जवळचा असून त्याला बगदादीचा वारसदार म्हणूनही पाहण्यात येते. अमेरिकी हल्ल्यात बगदादी ठार झाल्यानंतर आयसीसच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.