काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर निघालेल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाला शनिवारी श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आल्यानंतर जवळपास तीन तासांमध्ये त्या सर्वांची दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली. यादरम्यान, विमानातील प्रवासात एका काश्मिरी महिलेने राहुल गांधींसमोर आपल्या समस्या मांडल्या. समस्यांची कैफियत मांडणाऱ्या त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याद्वारे काश्मिरींवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मोदी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. अशातच नेटकऱ्यांकडून या व्हिडिओला  पाकिस्तानच्या अहमदी मुस्लिमांच्या एका व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिलं जात आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानमधील एक अहमदिया मुस्लीम नागरीक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडताना दिसत असून पाकिस्तानात किती आणि कशाप्रकारे त्यांच्यासोबत अत्याचार केले जात आहेत याबाबत आपली कैफियत मांडताना दिसत आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांमधल्या धार्मिक आधारांवर भेदभाव झालेल्या पीडितांची भेट घेतली, त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याची माहिती आहे. भेट घेणाऱ्यांमध्ये एका 81 वर्षीय अहमदिया मुस्लीम समुदायाच्या अब्दुल शुकूर नावाच्या प्रौढ व्यक्तीचाही समावेश होता. त्यांनी ट्रम्प यांच्यासमोर पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. अहमदी मुस्लिमांना पाकिस्तानात मुलभूत हक्कही नाकारण्यात आल्याचं त्यांनी ट्रम्प यांना सांगितलं. “अहमदिया पंथाच्या मुस्लिमांना पाकिस्तानात 1974मध्ये गैर मुस्लिम घोषीत करण्यात आले आहे. त्यानंतर आमची घरं जाळण्यात आली. मुलभूत हक्क नाकारले गेले. आमचे उद्योग व्यवसाय संपविण्यात आले. त्या परिस्थितीत पत्नी आणि मुलांना घेऊन आम्ही दुसऱ्या भागात (Rabwah) स्थायीक झालो, तेथे मी पुस्तक विक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण त्यांनी मला नाहक तुरुंगात डांबून पाच वर्षांची शिक्षा दिली आणि 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला…तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर माझी सुटका करण्यात आली आहे. मी अमेरिकेत आहे म्हणून स्वतःची ओळख मुस्लीम अशी करुन देऊ शकतो, पण पाकिस्तानात स्वतःला मुस्लीम म्हणू शकत नाही, अन्यथा मला कठोर शिक्षा होईल”, असं हा व्यक्ती ट्रम्प यांना सांगताना दिसतोय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जुलै महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांमधल्या धार्मिक आधारांवर भेदभाव झालेल्या पीडितांची भेट घेतली. त्यावेळी अब्दुल शुकूर यांनी आपलं गाऱ्हाणं त्यांच्यासमोर मांडलं.