अमेरिकेचा पाकिस्तानात ड्रोन हल्ला; शांतता चर्चेतील अडथळा दूर
अफगाण तालिबानचा कमांडर मुल्ला अख्तर मन्सूर हा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला असून त्याबाबतची माहिती पाकिस्तानने मागवली आहे. अफगाणिस्तान सीमेलगतच्या पाकिस्तानी भागात तो मारला गेला असून त्यामुळे तालिबानचे कंबरडे मोडले आहे. मन्सूर याचा शांतता प्रक्रियेला विरोध होता त्यामुळे तो मारला गेल्याने त्यातील अडसर दूर झाला आहे. अमेरिकेच्या मनुष्यरहित ड्रोन विमानांनी अफगाणसीमेवर बलुचिस्तान प्रांतातील अहमद वाल शहरात मन्सूर व आणखी एक दहशतवादी वाहनाने प्रवास करीत असताना त्यांना ठार केले, असे अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले. ड्रोन हल्ला करण्याचे अधिकार अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले होते. अमेरिकेच्या नेव्ही सील्सनी अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेन याला ठार करण्यासाठी जी मोहीम आखली होती, त्याच्याशी या मोहिमेची तुलना काहींनी केली आहे. अमेरिका पाकिस्तानातील तालिबान्यांना लक्ष्य करू शकते असा संदेश यातून गेला आहे. अफगाणिस्तानच्या गुप्तचर संस्थेने सांगितले, की मन्सूर हा वयाच्या पन्नाशीतील दहशतवादी होता व तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ठार झाला. मन्सूर याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती व बलुचिस्तानात त्याला त्याच्या साथीदारांसह ठार करण्यात आले, असे राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने सांगितले. अफगाणिस्तान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दौलत वझिरी यांनी मन्सूर मारला गेल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. काबूल येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की तालिबानने नवीन नेत्याची निवड करून राजकीय पक्षासारखे वागावे. म्यानमारची राजधानी न्याप्यादॉ येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले, की मन्सूर हा अमेरिकी लष्कराला, अफगाणी नागरिक व सुरक्षा दलांना धोकाच होता. त्याने शांतता वाटाघाटींना विरोध केला होता. अमेरिकेच्या पेंटॅगॉन या संरक्षण मंत्रालयानेही मन्सूर ठार झाल्याचे जाहीर केले आहे. तो तालिबानचा नेता होता व अफगाणिस्तानातील कारवायात तो सामील होता, असे पेंटॅगॉनचे प्रसिद्धी सचिव पीटर कुक यांनी सांगितले.
२०१३ मध्ये मुल्ला महंमद उमर मारला गेला होता, त्यानंतर मन्सूर प्रमुख झाला. त्यानंतर अनेक दहशतवादी हल्ले झाले होते. हल्ल्यानंतर पाकिस्तान व अफ गाणिस्तान या देशांना त्याची कल्पना देण्यात आली, असे अमेरिकेने म्हटले आहे. काबूल येथे अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी सांगितले, की मन्सूर मारला गेल्याचे खरे असेल, तर त्यांच्या संघटनेत काही बदल होतील व ते शांतता प्रक्रियेत सहभागी होतील असे वाटते.
अमेरिकी सिनेटच्या शस्त्रास्त्र समितीचे प्रमुख जॉन मॅक्केन यांनी मन्सूर मारला गेल्याच्या घटनेचे स्वागत केले आहे. परराष्ट्र समितीचे अध्यक्ष बॉब कॉर्कर यांनी सांगितले, की मन्सूर मारला गेला असेल तर तो मोठा विजय आहे. पाकिस्तानने सकारात्मक भूमिका घेतली, तर आम्ही तालिबानला अस्थिर करू शकतो.

* अफगाणिस्तानातच जन्मलेला मन्सूर हा १९९० पासून तालिबानमध्ये होता व २०१३ पासून संघटनेचा सूत्रधार होता.
* मन्सूर हा या आधी क्वेट्टातील शुराचा प्रमुख होता. अमेरिकी सुरक्षा मंडळाच्या र्निबध यादीनुसार मन्सूर हा प्रमुख तालिबानी नेता होता, त्याला पाकिस्तानात पकडण्यात आले होते पण नंतर सप्टेंबर २००६ मध्ये तो परत अफगाणिस्तानात गेला.
* खोश्त, पाकटिया, पाकटिका या भागात तो अमली पदार्थ तस्करी व इतर कारवायांत सामील होता. मे २००७ मध्ये तो तालिबानचा कंदाहार येथील गव्हर्नर होता.
* २०१० मध्ये तो ओमरचा उपप्रमुख झाला.
* तालिबानी लष्कराचे निमरूझ व हेल्मंड प्रांतातील काम तो पाहत होता.