अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी नेवाडाच्या महत्त्वाच्या फेरीत विजय मिळवला असून त्यांचा हा लागोपाठ तिसरा विजय आहे. स्थावर मालमत्ता उद्योगातील एक बडे प्रस्थ असलेल्या ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या आशा त्यामुळे उंचावल्या आहेत.
अब्जाधीश असलेले ट्रम्प हे रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आहेत. त्यांनी विरोधकांना चितपट केले व मतदारांच्या जवळपास प्रत्येक प्रवर्गात त्यांना स्थान मिळत असल्याची चिन्हे आहेत. ट्रम्प यांना ४६ टक्के तर फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबियो व टेक्साचे सिनेटर टेड क्रूझ यांना कमी मते मिळाली. मतदानास मोठा प्रतिसाद मिळाला. मेंदूरोगतज्ञ असलेले उमेदवार बेन कार्सन व ओहिओचे गव्हर्नर जॉन कॅसिच यांना अनुक्रमे सहा व चार टक्के मते मिळाली आहेत. एवढे यश मिळेल असे वाटले नव्हते आता आम्ही देशजिंकला आहे, असे ट्रम्प यांनी समर्थकांपुढे सांगितले. ट्रम्प यांनी चारपैकी तीन राज्येजिंकली आहेत त्यात दक्षिण कॅरोलिना व न्यू हॅम्पशायर यांचा समावेश आहे. आयोवात त्यांचा दुसरा क्रमांक लागला ती लढत क्रूझ यांनीजिंकली होती. मार्चमधील पहिल्या मंगळवारी ११ राज्यात निवडणूक होत असून त्याचा रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार यावर मोठा परिणाम होणार आहे.
आताच्या जनमत चाचण्यांवर त्यांनी सांगितले की, टेक्सास, टेनिसी, जॉर्जिया, अरकान्सास व फ्लोरिडा या राज्यात चांगली स्थिती आहे. ओहिओत आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत, मिशीगनमध्येही स्थिती चांगली आहे.