अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्टय़ा दुभंगल्याचे स्पष्ट झाले. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले आहेत. त्यामुळे निकाल फिरवू शकतील अशा मोजक्या राज्यांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री उशिरापर्यंत ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २२४, तर ट्रम्प यांना २१३ मते मिळाली होती. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत. असं असलं तरी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरु शकते असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात. त्यामुळेच दोघांना समान म्हणजे २६९ मते मिळाल्यास काय यासंदर्भात आता चर्चा सुरु झाली आहे. बायडेन यांनी २०१६ हिलरी क्लिंटन यांनी जिंकलेल्या सर्व राज्यांबरोबरच मिशीगन, विस्कॉन्सीन आणि अॅरेझॉनामध्ये विजय मिळवल्यास दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजेच २६९ मते मिळतील. किंवा हिलरी यांनी जिंकलेली सर्व राज्ये आणि मिशीगन तसेच पेनसिल्वेनिया बायडन यांनी जिंकल्यास दोन्ही उमेदवारांना समान मतं होतील.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एकूण ५३८ प्रातिनिधिक मते असतात. प्रत्येक राज्याचा आकार आणि तेथील लोकसंख्येच्या आधारे ती ठरवली जातात. ही संख्या सम असल्याने दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळू शकतात. असं झाल्यास अमेरिकन काँग्रेसचे सदस्य मतदानाच्या माध्यमातून अमेरिकाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष निश्चित करु शकतात. हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्ह पुढील राष्ट्रपती कोण यासाठी मतदान करु शकतात.  प्रत्येक राज्याचे एक याप्रमाणे या निवडणुकीमध्ये बहुमतासाठी २६ मतं आवश्यक असतील. दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यास सिनेटकडे उपराष्ट्राध्यक्ष निवडण्याची जबाबदारी असते. सिनेटमधील १०० सदस्य मतदान करतात त्यामुळे येथे बहुमताचा आकडा हा ५१ इतका असतो. मात्र सध्याची स्थिती पाहता बायडेन या निवडणुकीमध्ये बाजी मारतील असं चित्र दिसत आहे.