अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरु आहे. डेमोकॅट्रिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन सध्या बहुमताच्या अगदी जवळ आहेत तर ट्रम्प मात्र पिछाडीवर आहेत. बायडेन २६४ मतांसोबत आघाडीवर असून त्यांचा विजय नक्की मानला जात आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र २४१ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा विजयाचा दावा केला आहे. सोबतच अनधिकृत मतांच्या आधारे विजय चोरी केला जात असल्याचा आरोप केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, “जर तुम्ही अधिकृत मतांची मोजणी केलीत तर मी सहज जिंकतोय. पण जर तुम्ही अनधिकृत (मेल इन बॅलेट्स) मतही मोजलीत तर ते (डेमोकॅट्रिक) याद्वारे आमच्या हातातून विजय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अनेक राज्यांमध्ये ऐतिहासिक मतांनी विजय मिळवला आहे”.

आणखी वाचा- US Election 2020 : न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर यापूर्वी दोन वेळा बदललाय निवडणुकीचा निकाल

डोनाल्ड ट्रम्प यांनी ओपिनिअन पोल्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून खोटे असल्याचा आरोप केला आहे. “ओपिनिअन पोल्समध्ये जाणुनबुजून संपूर्ण देशात ब्ल्यू वेव्ह (डेमोकॅट्रिक पक्षाच्या समर्थनार्थ) दाखवण्यात आला. खरं तर अशी कोणतीही लाट नव्हती. संपूर्ण देशात रेड वेव्ह (रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने) आहे. प्रसारमाध्यमांनाही याची कल्पना होती, पण आम्हाला फायदा झाला नाही”.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेल इन बॅलेट्समध्ये गडबड झाल्याची शंका उपस्थित केली आहे. “मेल इन बॅलेट्स ज्या पद्धतीने फक्त एका बाजूचे दिसत आहेत त्यावरुन आश्चर्य वाटत आहे. ही एक भ्रष्ट प्रक्रिया असून लोकांनाही भ्रष्ट करत आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- पराभवानंतरही ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं नाही तर काय होणार?

आणखी वाचा- …तर १०० वर्षात डोनाल्ड ट्रम्प ठरतील राष्ट्राध्यक्षपदाची फेर निवडणूक न जिंकणारे पाचवे अध्यक्ष

पुढे ते म्हणाले की, “ही निवडणूक आम्ही सहजपणे जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. पण यासाठी आम्हाला अनेकदा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहेत. आमच्याकडे पर्याप्त पुरावे आहे आणि याचा शेवट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात होईल. आम्ही या निवडणुकीवर डल्ला टाकू देणार नाही”.