अमेरिकेचे माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नवा विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. बुधवारी अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये बायडेन यांनी सर्वाधिक मत मिळवण्याचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा विक्रम मोडीत काढला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत सात कोटी तीन लाख ३० हजाराहून अधिक मतं मिळवली आहेत. फेड्रल इलेक्शन कमिशनच्या आकडेवारीनुसार २००८ साली पहिल्यांदा निवडणूक लढणाऱ्या बराक ओबामा यांनी सहा कोटी ९४ लाख ९८ हजार  ५१६ मतं मिळवली होती.

बायडेन यांना आतापर्यंत मिळालेल्या मतांची टक्केवारी ५०.१९ इतकी आहे. मात्र मतमोजणी अद्याप सुरु असल्याने ही टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना सहा कोटी ७५ लाख ३८ हजार ९७३ मतं मिळाली आहेत. ही टक्केवारी एकूण मतांच्या ४८ इतकी आहे. इलेक्ट्रोल मतांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये अगदी चुसशीची लढत पहायला मिळत आहे. ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २६४, तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे.

नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर, गाड्या, विमान अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल

या आकडेवारीवरुन यंदा अमेरिकेमधील नागरिकांनी मोठ्याप्रमाणामध्ये मतदान केल्याचे दिसून येत आहे. २०१६ च्या तुलनेत यंदा खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे चित्र पहायला मिळालं. अद्याप मतमोजणी संपली नसल्याने दोन्ही उमेदवार ओबामांचा विक्रम मोडीत काढतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बहुतेक राज्यांतील मतमोजणी बुधवारी झालेली असली किंवा कल स्पष्ट झालेले असले, तरी अ‍ॅरिझोना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशीगन, पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का आणि मेन या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. काही राज्यांमध्ये टपाली मते आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये झालेले मतदान मोठय़ा प्रमाणावर असून ती मतमोजणी निकाल फिरवणारी ठरू शकते. अ‍ॅरिझोना, नेवाडा, विस्कॉन्सिन, मिशीगन आणि पेनसिल्वेनिया या राज्यांत मिळून ६३ प्रातिनिधिक मते मिळवून २७० चा आकडा गाठण्याचा बायडेन यांचा प्रयत्न आहे. जॉर्जिया राज्यात बायडेन यांनी अनपेक्षित यश मिळवले असून, येथे १६ प्रातिनिधिक मते आहेत. सिनेट आणि प्रतिनिधिगृहासाठी झालेल्या समांतर निवडणुकीत अनुक्रमे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या जागा कमी होतील, अशी चिन्हे आहेत. येथेही मतदारांनी संमिश्र कौल दिलेला दिसून येतो.

मतदारांनी अर्थव्यवस्थेच्या मुद्दय़ावर ट्रम्प यांच्या बाजूने तर करोना साथीच्या मुद्दय़ावर बायडेन यांच्या बाजूने कौल दिला आहे. आधी झालेले दहा कोटी मतदान यात निर्णायक आहे कारण त्यात बरीच मते बायडेन यांना मिळाल्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी बुधवारी असा दावा केला, की अमेरिकी लोकांवर हा निवडणूक घोटाळा लादण्यात आला असून आपण ही निवडणूक आता न्यायालयातच लढू. वॉशिंग्टन स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे २ वाजता आपण निवडणूक जिंकल्याचा दावा करून त्यांनी साऱ्यांनाच बुचकळ्यात पाडले. आधी मतदान झालेली मते पहाटे चारच्या सुमारास मतदान मोजणी प्रक्रियेत सामील करण्याची ट्रम्प यांची अपेक्षा होती, पण ३ कोटींहून अधिक टपाली मते व आधीच झालेले एकूण १० कोटी मतदान यामुळे हे सगळे जवळपास अशक्य होते. त्यामुळे टपाल सेवेने लगेच ही मते मोजणी प्रक्रियेत आणण्याबाबत असमर्थता दाखवली. ट्रम्प म्हणाले, की देशासाठी ही वेदनादायी बाब असून आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो व जिंकलीच आहे. लोकांनी जो पाठिंबा दिला त्याबाबत त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. आपण आपल्या समर्थकांसह विजय साजरा करू असे त्यांनी स्पष्ट केले.