अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प परभवाच्या छायेत असतानाही तो मान्य करण्यास तयार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प वारंवार मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत असून न्यायालयातही धाव घेतली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य बायडेन यांनी गंभीरतेनं घेतल्याचं दिसत आहे. “आम्ही दोघं विरोधक असू शकतो परंतु एकमेकांची वैरी नाही. आम्ही अमेरिकन आहोत,” असं जो बायडेन म्हणाले. दरम्यान, पहिल्याच दिवशी करोनावर आपण अ‍ॅक्शन प्लॅन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदावर जबरदस्ती कब्जा करू नये. कारण या प्रकरणी कायदेशीर कारवाई आताच सुरू झाली आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, बायडेन यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदावर दावा केला. “प्रत्येक मिनिटांनंतर हे सिद्ध होत आहे की विक्रमी संख्येत अमेरिकन लोकांनी मग यामध्ये कोणत्याही जाती धर्माचे लोकं असतील त्यांनी बदलांच्या दिशेनं मतदान केलं आहे. आम्ही यात विजयी होणार आहोत हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे,” असंही बायडेन यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- US Election 2020: पराभवाच्या छायेत असणाऱ्या ट्रम्प यांचा बायडेन यांना इशारा, म्हणाले…

“आम्हाला कोविड अ‍ॅक्शन प्लॅनसाठी, अर्थव्यवस्थेवरील अ‍ॅक्शन प्लॅनसाठी जनादेश मिळाला आहे. आम्हाला हवामान बदल आणि वर्णभेदाविरोधात काम करण्यासाठी जनादेश मिळाला आहे,” असंही बायडेन यांनी स्पष्ट केलं. सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी करोना विषाणूवर मात करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला जाणार असल्याचंही बायडेन म्हणाले.

आणखी वाचा- तेव्हा ‘मुंबईकर बायडेन’ यांचं पत्र आलं…; जो यांचं मुंबईशी आहे खासं नातं

आणखी वाचा- “…अन् उडी मारुन सारं काही संपवावं”; बायडेन यांनी केलेला आत्महत्येचा विचार

आपल्या कार्यकर्त्यांनाही बायडेन यांनी सल्ला दिला आहे. “कठिण निवडणुकीनंतर तणाव अधिक असतो हे आम्हाला माहित आहे. परंतु आम्हाला शांत राहण्याची गरज आहे. कोणत्याही निवडणुकीचा अर्थ केवळ न थांबता भांडणं करत राहणं असा नाही,” असंही त्यांनी सांगितलं. “आम्ही एकमेकांचे स्पर्धक विरोधक असू शकतो. परंतु आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आम्ही अमेरिकन आहोत,” असंही बायडेन यांनी स्पष्ट केलं.