अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन तर उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या निवडीचे जागतिक पातळीवर विविध देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले असून सुरक्षा, व्यापार, हवामान बदल या महत्त्वाच्या सामुदायिक अग्रक्रमाच्या विषयांवर मोठय़ा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानमध्येही बायडेन यांच्या विजयामुळे आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानवर धारधार शब्दांमध्ये टीका करायचे. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध फारसे चांगले राहिले नाहीत. त्यामुळेच ट्रम्प यांचा पराभव आणि पाकिस्तानबद्दल सहानुभूती असणाऱ्या बायडेन यांच्या विजयामुळे पाकिस्तानने समाधान व्यक्त केलं आहे. आता पुन्हा दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील अशी अपेक्षा पाकिस्तानला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बायडेन यांचा शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कराच्या रक्कमेमध्ये होणारी चोरी आणि इतर अनेक मुद्द्यांवर अमेरिकेसोबत काम करण्याची इच्छा इम्रान यांनी व्यक्त केली आहे.

नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर, गाड्या, विमान अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरयम नवाज शरीफ यांनाही बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. इम्रान यांनी केलेल्या ट्विटमध्ये बायडेन आणि कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर इम्रान यांनी ग्लोबल समीट ऑन डेमोक्रॅसी म्हणजेच लोकशाहीवरील जागतिक परिषद, अनधिकृतरित्या होणारी टॅक्स चोरी संपवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून देशात होणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांमध्ये सहभागी अशणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. इम्रान यांनी आपल्या ट्विटमध्ये आम्ही अफगाणिस्तान आणि इतर प्रदेशामध्ये शांतता नांदावी म्हणून अमेरिकेसोबत काम करत राहू असं म्हटलं आहे.

शरीफ यांनाही ट्विटरवरुन बायडेन यांना ऐतिहासिक विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. तुमच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंध आणखीन मजबूत होतील अशी अपेक्षा शरीफ यांनी व्यक्त केलीय.

बायडेन हे आधीपासूनच पाकिस्तान समर्थक नेते आहेत. बायडन यांना पाकिस्तानमधील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्रदान करण्यात आलाय. २००८ मध्येच बायडेन यांना ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ने सन्मानित करण्यात आलं आहे. पाकिस्तानला अमेरिकेने आर्थिक मदत करायला हवी असं मत असणाऱ्या मोजक्या अमेरिकन नेत्यांमध्ये बायडेन यांचा समावेश होतो.

दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार

बायडेन यांना ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळण्यामागेही एक खास कारण आहे. २००८ साली बायडेन यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला दरवर्षी अडीच बिलियन डॉलरची आर्थिक मदत देण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली होती. सीनेटमध्ये पाकिस्तानला मदत करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव बायडेन आणि रिचर्ड लुगर यांनी मांडला होता. तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी ‘कायम पाकिस्तानच्या सोबत उभं राहिल्याबद्दल’ बायडेन यांचे आभार मानले होते. पाकिस्तानी हा दहशतवादाचा फटका बसलेला देश असून त्याला यामधून सावरण्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे असं बायडेन यांचं मत आहे.

पाकिस्तानला असा होणार फायदा

पाकिस्तानमधील राजकीय जाणकारांच्या मते बायडेन व्हाइट हाऊसमध्ये गेल्यास कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या पाकिस्तानला खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बायडन आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखीन सुधारण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा पाकिस्तानी राजकीय तज्ज्ञांना आहे. पाकिस्तानी लष्करामधून निवृत्ता झालेले लेफ्टिनंट जनरल आणि राजकीय विषयांवरील अभ्यास असणाऱ्या तलक मसूद यांनी बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा सुधरतील. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखीन बळकट करण्यासाठीही होईल असा अंदाज पाकिस्तानी राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.