अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारपासून सार्वजनिक सभांना उपस्थिती लावणार आहेत. व्हाइट हाऊसमधील डॉक्टरांनी त्यांना यासाठी परवानगी दिली आहे. गुरुवारी डॉक्टरांनी यासंदर्भातील घोषणा करताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी करोनासंदर्भातील औषधांचा कोर्स पूर्ण केला असून ते आधीसारखे सामान्यांमध्ये मिसळू शकतात असं म्हटलं आहे. शुक्रवारी ट्रम्प यांची आणखीन एक करोना चाचणी होणार आहे. त्यानंतर ते शनिवारी सार्वजनिक प्रचारसभेत सहभागी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त  दिलं आहे.

ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कोनली यांनी, “मागील गुरुवारी म्हणजेच जेव्हा ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले तेव्हापासून शनिवारपर्यंतचा कलावधी हा दहा दिवसांचा आहे. या कालावधीमध्ये संपूर्ण टीमने त्यांच्यावर योग्य उपचार केले असून त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही घेण्यात आला आहेत. ते आता पूर्णपणे बरे झाले असून. आता राष्ट्राध्यक्षांना सार्वजनिक जीवनामध्ये आधीसारखे परतणे शक्य आहे,” असं म्हटलं आहे. सोमवारी ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्ये दाखल झाले. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी तीन दिवस रुग्णालयामध्ये उपचार घेतले. ट्रम्प यांनी औषधांना चांगला प्रतिसाद दिला. इलाज सुरु असताना त्यांच्या शरीरावर औषधांचा कोणताच विपरित परिणाम दिसून आला नाही. तसेच ट्रम्प यांना औषधांची एलर्जी झाल्याचेही काही लक्षण दिसून आलं नाही असंही कोनली यांनी स्पष्ट केलं आहे.

नक्की वाचा >> …तर प्रत्येक १६ व्या सेकंदला जन्माला येईल मृत बालक; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

यापूर्वी ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या माध्यमातून आता करोनाचा संसर्ग होणार नाही असं सांगितलं होतं. आपण करोनावरील उपचार पूर्ण केले असून आता पूर्वीपेक्षा मला खूपच जास्त चांगलं वाटत आहे असंही ट्रम्प यांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. मात्र ट्रम्प यांची शुक्रवारी करोना चाचणी केली जाणार असून तिच्या निकालांवरच शनिवारच्या सार्वजनिक सभेमधील त्यांच्या उपस्थितीसंदर्भात अखेरचा निर्णय घेण्यात येईल असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

व्हाइट हाऊस करोनाचे हॉटस्पॉट ठरलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीबरोबर व्हाइट हाऊसमधील १२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मागील काही दिवसांमध्ये समोर आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. यासाठी आता केवळ तीन आठवड्यांचा काळ शिल्लक राहिला आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सार्वजनिक सभा घेण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते.