मंगळवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. करोनाचं संकट असलं तरी यादरम्यान मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडले होते. याच निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली असून ट्रम्प व बायडेन या दोघांमध्ये अनेक ठिकाणी चुसशीची लढत दिसून येत आहे. एपी न्यूच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी केंटकी, इंडियाना, ओकलाहोमा, टेनेसी, वेस्ट वर्जीनिया, नेब्रास्का, नॉर्थ और साउथ डाकोटा, यूटा, नेब्रास्का, लुइसियाना, साउथ कैरिलोना, अल्बामा, वायोमिंग, कंसास, मिसौरी, मिसिसिपी, ओहियो या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. मात्र बायडेन हे ट्रम्प यांना जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. जो बायडन यांना २३७ इलेक्ट्रोल वोट मिळाले आहेत. तर ट्रम्प यांना २१० इलेक्ट्रोल वोट मिळाले आहेत. एकीकडे मतमोजणी सुरु असतानाच दुसरीकडे ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर मतचोरीचा आरोप केला आहे. मात्र ट्रम्प यांनी केलेलं हे ट्विट ट्विटरने ब्लॉक केलं आहे.

ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावर मतचोरी करत असल्याचा आरोप केलाय. “आपला मोठा विजय होणार आहे पण ते (विरोधक) मतचोरी करत आहेत. मात्र आपण त्यांना यामध्ये कधीच यशस्वी होऊ देणार नाही. मतदानाचा वेळ निघून गेल्यानंतर मतदान करता येत नाही,” असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र या ट्विटमुळे निवडणूक प्रक्रियेबद्दल गोंधळ निर्माण होऊ शकतो असं कारण देत ट्विटरने ते ब्लॉक केलं आहे.

ट्रम्प यांनी यापूर्वीच टपाली मतदानावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.  निवडणुकांचा निकाल मान्य न करता न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.  काहीही निकाल लागला तरी तो अमान्य करू असेच ट्रम्प यांनी म्हटले आहे. पेनसिल्वानियातील टपाली मतदान जर मतमोजणीनंतर तीन दिवसांनी मोजले जाणार असेल तर आपण न्यायालयात जाणार आहोत असे ट्रम्प यांनी सांगितले.