अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत आतापर्यंत ५ कोटी ८७ लाख लोकांनी मतदान केले असून टपाली मतदान वाढल्याने निवडणूक निकाल जाहीर होण्यास उशीर होणार असून निकाल ३ नोव्हेंबरच्या पुढे लांबू शकतो असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ च्या निवडणुकीत मतदारांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात आधीच मतदान केले नव्हते.

सीएनएनने म्हटले आहे की, पन्नास राज्ये व वॉशिंग्टन डीसी या सर्व भागात एडिसन रीसर्च व कॅटॅलिस्ट यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ५ कोटी ८७ लाख लोकांनी आतापर्यंत मतदान केले आहे. ३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीस आता अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत.

२०१६ मध्ये ५ कोटी ८७ लाख लोकांनी आधीच मतदान केले होते. २०१६ मधील एकूण मतदानाच्या हे प्रमाण ४२ टक्के होते. यंदाच्या निवडणुकीत २०१६ मधील निवडणूक पूर्व मतदानाचा असलेला टक्का ओलांडला गेला असून आधीच मतदानाचे प्रमाण वाढले आहे. करोना साथीच्या कारणास्तव हे मतदान वाढले असण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत १८ किंवा त्याहून अधिक वयाचे २५ कोटी ७० लाख लोक आहेत. यावर्षी २४ कोटी लोक मतदानास पात्र आहेत, असे ‘यूएसए टुडे’ने म्हटले आहे. सीएनएनच्या माहितीनुसार ३ नोव्हेंबरच्या रात्री ट्रम्प किंवा बायडेन यांच्यापैकी कोण निवडून आले हे समजणार नाही कारण अध्यक्षीय निवडणुकीत टपाली मतदान अधिक झाले आहे. २०१६ मध्ये होती त्यापेक्षा जास्त अनिश्चितता यावेळी असणार आहे.

करोना साथीमुळे अध्यक्षीय निवडणुकीतील मतदानाची पद्धतच बदलल्यासारखे झाले आहे. आतापर्यंत ज्या ५ कोटी ८७ लाख मतदारांनी मतदान केले आहे त्यातील ५४ टक्के हे सोळा स्पर्धात्मक राज्यातील आहेत. त्यांचा अमेरिकी अध्यक्ष ठरवण्यात नेहमी निर्णायक वाटा असतो. मिनेसोटा येथे सर्वाधिक मतदान झाले असल्याचे कॅटॅलिस्टने म्हटले आहे. १८-२९ वयोगटातील लोकांचे मतदान सर्वाधिक झाले असून गेल्या निवडणुकीपेक्षा आधीच मतदान करण्यात त्यांची टक्केवारी प्रमुख राज्यात अधिक आहे.