अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी आणि निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र निकालांना उशीर होण्याच्या याच शक्यतेबद्दल फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक असणाऱ्या मार्क झुकेरबर्गने अमेरिकेमध्ये नागरी असंतोष उसळण्याची भीती व्यक्त केली आहे. अमेरिकन निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उशीर झाला किंवा काही गोंधळ झाल्यास देशामध्ये अशांतता पसरेल असं मार्क म्हणाला आहे. मार्क कॅपिटोल हिल येथील एका कार्यक्रमामध्ये बोलत होता.

याच भीतीमुळे मार्कने अन्य सोशल नेटवर्किंग साईट्स आणि खास करुन फेसबुकच्या आपल्या टीमला सतर्क केलं आहे. हा काळ सोशल मीडियासाठी अग्नी परीक्षेसारखा आहे. फेसबुकसाठीही हा परीक्षेचा काळ आहे, असं मार्क म्हणाला आहे. फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची आणि उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही मार्कने म्हटलं आहे. मतदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव येणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेणे ही सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी असल्याचे मत मार्कने मांडल्याचे एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर फेसबुकने मतदारांची फसवणूक केल्याचे आरोप झाले होते.

आणखी वाचा- US Election : वारा, पाऊस, बायडेन अन् प्रचारसभा… साताऱ्याची पुनरावृत्ती अमेरिकेतही होणार?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या आधी पैसे देऊन फेसबुकच्या माध्यमातून केलेली एक राजकीय जाहिरात फेसबुकने हटवल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला. विरोधी पक्षांनी फेसबुकने आमच्या निवडणूक प्रचारामध्ये अडथळा आणून त्याचा प्रभाव कमी केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकने एका जाहिरातील नकार दिल्यानंतर डेमोक्रॅटिक पार्टीने फेसबुकवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर असणाऱ्या रॉब लिदर्न यांनी आम्ही या प्रकरणाची चौकशी कर असून काही जाहिरातींना चुकीच्या पद्धतीने हटवण्यात आले नाही ना यासंदर्भात तसाप सुरु असल्याची माहिती दिली. मागील वर्षी झालेल्या आरोपांमुळे यंदा फेसबुकने राजकीय जाहिरातींसंदर्भातील नियम अजून कठोर केले आहेत.

फेसबुकवरील ज्या जाहिरातीमुळे वाद झाला त्यामध्ये ट्रम्प यांच्या विजयाचा दावा करण्यात आला होता. यावर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्या प्रसारमाध्यम सल्लागार अशणाऱ्या मेगन क्लासेनने फेसबुकवर आरोप करत फेसबुकने आमची जाहिरात स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटलं होतं. या जाहिरातीमध्ये मतदानाच्या दिवसाचा उल्लेख असल्याने आम्हाला नकार देण्यात आला मात्र दुसरीकडे ट्रम्प यांची जाहिरात अजूनही दाखवली जात आहे, असं क्लासेन म्हणाले. क्लासेन यांनी ट्रम्प यांच्या जाहिरातीला स्क्रीनशॉर्ट ट्विट करत फेसबुकवर भेदभाव केल्याचा आरोप केला होता.