अमेरिकेतील तज्ज्ञांची प्रतिक्रिया

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला हल्ला अत्यंत काळजीपूर्वक केलेला होता व त्यात सर्व गोष्टींचे भान ठेवले होते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. हा संघर्ष वाढण्यास पाकिस्तानच जबाबदार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

कार्नेगी एंडोमेंट पीस या संस्थेचे अॅशले टेलिस यांनी सांगितले की, उरी येथील हल्ल्यानंतर उसळलेल्या जनक्षोभाची दखल मोदी घेणार नाहीत असे होणार नव्हते. भारताने बुधवारी पहाटे केलेला हल्ला म्हणजे पाकिस्तानला संदेश असून भारतीय लोकांना आश्वासित करण्याचा केलेला प्रयत्न आहे. भारताचा हल्ला मोजूनमापून व अतिशय काळजीपूर्वक केलेला होता. त्यात दहशतवादी गटांना लक्ष्य करण्यात आले. त्यात भारताने प्रतिकाराचे स्वातंत्र्य गमावले नसल्याचे तर दाखवून दिले आहेच शिवाय तणाव पाकिस्तानमुळे वाढतो आहे हे स्पष्ट झाले आहे.

टेलिस यांनी सांगितले, आता अमेरिका पाकिस्तानला संयमाचाच सल्ला देईल हे खरे असले तरी भारतालाही त्याच्या हितसंबंधांचे रक्षण करावे लागणार आहे कारण अमेरिकेने पाकिस्तानला केलेल्या विनंत्यांवर फारसे अवलंबून राहता येणार नाही. पाकिस्तानचे हात आता बांधलेले आहेत, त्यामुळे तो भारताला लष्करी प्रत्युत्तर देण्याची शक्यता कमी आहे, पण मोठी अपारंपरिक युद्धे भारताविरोधात चालूच राहतील. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे रिक रोसॉ यांनी सांगितले की, भारताने ज्या पद्धतीने म्यानमारच्या हद्दीत घुसून बंडखोरांवर हल्ला केला होता त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये असा हल्ला होऊ शकतो याचे संकेत मिळाले होते. पाकिस्तान विरोधात भारताने नवे शस्त्र उपसले आहे. त्यात सार्क बैठकीतून माघार, दक्षिण आशियायी देशांशी व अमेरिकेशी चांगले सुरक्षा संबंध या उपायांचा समावेश होता. यातून पाकिस्तानला योग्य तो संदेश गेला आहे, पण यात संवादातून संदेशांची देवाणघेवाण महत्त्वाची आहे त्यातून एकमेकांची उद्दिष्टे समजतील व तणाव आणखी वाढणार नाही. भारताने हा हल्ला केला असला तरी पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणात असलेले दहशतवादी गट हल्ले थांबवतील अशातली शक्यता नाही, पण पाकिस्तानला मात्र दहशतवादाला पाठिंबा देण्याची किंमत समजून चुकेल. दोन्ही देशातील संघर्ष आणखी चिघळेल की नाही याचा अंदाज करणे अवघड आहे असे रोसॉ यांनी सांगितले.