अमेरिकेतील एफ-१६ लढाऊ विमान आता भारतात तयार होणार आहे. एफ-१६ विमानाची निर्मिती करणाऱ्या लॉकहिड मार्टिन कंपनीने ‘टाटा’सोबत करार केला आहे. पॅरिसमधील एअर शो दरम्यान हा करार झाल्याचे सूत्रांकडून समजते.

वायूदलाच्या ताफ्यातील सोव्हिएतकालीन विमाने सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर असून या पार्श्वभूमीवर नवीन लढाऊ विमान खरेदी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एफ १६ विमानाची निर्मिती करणाऱ्या लॉकहिड मार्टिन कंपनीने भारताला विमान विकण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशांतर्गत विमान बांधणी क्षेत्राच्या विकासासाठी लढाऊ विमानांची निर्मिती भारतात व्हावी, असे वाटते. मोदी सरकारने तशी अटही कंपनीसमोर ठेवली होती. मोदी सरकारची ही अट पूर्ण करत लॉकहिडने भारतात विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने टाटासोबत करार केला असून पॅरिसमध्ये हा करार झाला.

नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहीमेला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असली तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाशी विसंगत असा हा करार आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेतील कंपन्यांनी अमेरिकेतच उत्पादन प्रकल्प सुरु करुन रोजगार वाढवावा अशी भूमिका मांडली आहे. भारतात प्रकल्प सुरु होणार असला तरी अमेरिकेतील रोजगारावर कपात येणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील करार वाढत असून भारताला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. यानंतर रशिया आणि इस्त्रायल या देशांचा क्रमांक लागतो. जगातील २६ देशांमध्ये एफ १६ हे लढाऊ विमान वापरले जाते. कंपनीने आत्तापर्यंत ३,२०० विमानांची निर्मिती केली आहे. भारताच एफ १६ गटातील ब्लॉक ७० हे अत्याधुनित विमान तयार केले जाणार आहे.