रेमडेसिविर औषध निर्मितीसंबंधी जगातील आघाडीच्या केमिकल आणि औषध कंपन्यांबरोबर आमची बोलणी सुरु आहेत. भारतीय कंपन्या सुद्धा यामध्ये आहेत. गिलीयड सायन्सेसनेच बुधवारी स्वत: ही माहिती जाहीर केली. गिलीयड सायन्सेसकडे रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रगचे पेटंट आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने एफडीएने करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारांसाठी रेमडेसिविर औषध वापरण्याची परवानगी दिली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेत करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारांमध्ये रेमडेसिविर औषध प्रभावी ठरल्याचे समोर आले आहे. व्हॉलंटरी लायसन्समध्ये पेंटटधारक जेनरीक औषधाच्या उत्पादकांना औषध बनवण्याची परवानगी देऊ शकतो. भारतामध्ये मोठया प्रमाणावर जेनरीक औषधांची निर्मिती केली जाते. भारत आणि पाकिस्तानातील जेनरीक औषध उत्पादकांना व्हॉलंटरी लायसन्स देण्यासंबंधी गिलीयड सायन्सेसची दोन्ही देशातील कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. जेणेकरुन रेमडेसिविर औषध विकसनशील देशांमध्ये जास्ती जास्त प्रमाणात उपलब्ध होईल. गिलीयडकडून याबदल्यात औषध निर्मितीचे संपूर्ण तंत्रज्ञान देण्यात येईल.

आणखी वाचा- “…अन्यथा पुन्हा देशभरात लॉकडाउन करावा लागेल”, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

भारताने सुरु केली तयारी
सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले आहे. हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे. औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.

उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी IICT ने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत.अमेरिकेत १०६३ रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. त्यात रेमडेसिविर औषध प्रभावी ठरत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा दिसून आली. शिवाय हे औषध करोना व्हायरसला ब्लॉक करते असा अमेरिकन संशोधकांचा निष्कर्ष आहे.