अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य देखभाल विधेयकाला रिपब्लिकनांचा विरोध कायम राहिल्याने अमेरिकेत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालीये. अमेरिकेतील नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी अर्थसंकल्प आणि सरकारी खर्च यावर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांमध्ये एकमत न झाल्याने राष्ट्रीय अंगिकृत विविध सेवा बंद कराण्याचा निर्णय व्हाईट हाऊसने घेतला. यामुळे अमेरिकी सरकारचे आर्थिक कामकाज ठप्प पडणार असून, अमेरिकेतील ८ लाख सरकारी कर्मचाऱयांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. केवळ अत्यावश्यक सरकारी सेवाच सुरू ठेवण्यात येणार आहेत. १९९५-९६ नंतर पहिल्यांदाच अमेरिकमध्ये या स्वरुपाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिकी सरकारचे ‘शटडाऊन’ म्हणजे काय?
बराक ओबामा यांच्या आरोग्य देखभाल विधेयकाला रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांचा विरोध आहे. या योजनेवरील खर्च कमी करण्याची त्यांची मागणी आहे. याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये एकमत झाले नाही. अमेरिकेचे नवीन आर्थिक वर्ष १ ऑक्टोबरपासून सुरू होते. तत्पूर्वी या आरोग्य विधेयकाला मंजुरी मिळणे गरजेचे होते. मात्र, या विधेयकात सुचविलेल्या दुरुस्त्या अद्याप करण्यात आल्या नसल्याने रिपब्लिकनांनी विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यास नकार दिला. विधेयक मंजूर न झाल्याने अत्यावश्यक सेवावगळता सरकार अंगिकृत राष्ट्रीय उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक स्मृतिस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय व्हाईट हाऊसने तातडीने घेतला.
अमेरिकी कॉंग्रेसने आपल्या जबाबदारीचे पालन केलेले नाही. अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली नाही. जोपर्यंत कॉंग्रेस अर्थसंकल्पाला मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत विविध सेवा बंद ठेवाव्या लागणार आहेत, असे ओबामा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे तेथील लष्कराला सांगितले.
देशाच्या सुरक्षिततेला असलेला धोका अद्याप टळलेला नाही. कोणत्याही स्थितीला तोंड देण्यास प्रत्येकाला तयार राहिले पाहिजे. अफगाणिस्तानातील अमेरिकेची लष्करी कारवाई पुढे चालू राहिल. राष्ट्रीय अंगिकृत सेवा बंद करण्याचा निर्णय व्हाईट हाऊसने घेतल्यामुळे त्याचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबीयांवर होणाऱया परिणामातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही ओबामा म्हणाले.