27 February 2021

News Flash

अमेरिकेत पुन्हा टाळेबंदी

डेमोक्रॅटिक सदस्यांमुळे शटडाऊनची नामुष्की आली असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

| January 21, 2018 01:17 am

अमेरिकी सिनेटने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच लघुमुदतीच्या खर्चाचे विधेयक फेटाळल्याने सरकारी कामकाज बंद झाले आहे.

सिनेटने खर्च विधेयक नाकारले; सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असतानाही प्रथमच नामुष्की

अमेरिकी सिनेटने पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच लघुमुदतीच्या खर्चाचे विधेयक फेटाळल्याने सरकारी कामकाज बंद झाले आहे. याला ‘शटडाऊन’ असे म्हटले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत असतानाच ही नामुष्की ओढवली आहे. रात्री १२ वाजून १ मिनिटाने काही रिपब्लिकन सदस्य डेमोक्रॅटिक सदस्यांना जाऊन मिळाले त्यामुळे ट्रम्प प्रशासनाची आर्थिक कोंडी करण्यात त्यांना यश आले. लघुमुदतीचे खर्च विधेयक त्यामुळे मंजूर झाले नाही. परिणामी, आता पेंटॅगॉन व संघराज्य संस्थांचे आर्थिक व्यवहार बंद झाले.

डेमोक्रॅटिक सदस्यांमुळे शटडाऊनची नामुष्की आली असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतल्याच्या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले असताना ही नामुष्की ओढवली आहे. ट्रम्प यांनी सांगितले, की डेमोक्रॅटिक सदस्यांनी शटडाऊन म्हणजे आर्थिक व्यवहार ठप्प केले, कारण त्यांना यात करकपातीचे यश पाहवत नव्हते व अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे हे सहन झाल्याने त्यांनी हे कुभांड रचून शटडाऊनची स्थिती आणली.

अनेक द्विपक्षीय बैठका होऊनही  अर्थपुरवठय़ासाठीचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. १६ फेब्रुवारीपर्यंतच्या तात्पुरत्या खर्चासाठी हे विधेयक मांडले होते, त्याच्या संमतीसाठी ६० मते मिळणे आवश्यक होते, पण ती मिळाली नाहीत व सिनेटमध्ये हे विधेयक  ५० विरुद्ध ४८ मतांनी  फेटाळले गेले. यात १६ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पापर्यंत आर्थिक गरजा भागवण्यासाठी तात्पुरते खर्च विधेयक मांडले जात असते ते फेटाळले गेले तर शटडाऊन म्हणजे अमेरिकेचे सरकारी आर्थिक व्यवहार ठप्प होत असतात.

डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेचे आर्थिक व्यवहार ठप्प करण्यासाठी ट्रम्प यांच्या विरोधात व्यूहरचना केली. ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांबाबत नमते घेऊन वाटाघाटीच्या पातळीवर यावे यासाठी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची आर्थिक कोंडी केली.

अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचा मार ए लागो या फ्लोरिडातील ठिकाणाचा साप्ताहिक दौरा रद्द केला असून, जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीसाठी ते पुढील आठवडय़ात दाओसला मात्र जाणार आहेत.  ट्रम्प यांनी शटडाऊन टाळण्यासाठी शुमर यांच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला.

२०१३ नंतर पुन्हा शटडाऊन

* शटडाऊनचे परिणाम सोमवारपासून जाणवतील. २. संघराज्य कर्मचाऱ्यांचे वेतन तेव्हापासून बंद होणार असून ते कामावरच येणार नाहीत.

* किमान ८ लाख कर्मचाऱ्यांना रजेवर जावे लागेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

* अर्थसंकल्प व्यवस्थापन कार्यालयाने हा शुमर शटडाऊनचा प्रकार असल्याचा टोला मारला.

* यापूर्वी २०१३ मध्ये शटडाऊनची नामुष्की आली होती. त्या वेळी ऑक्टोबर २०१३ मध्ये सोळा दिवस देऊन शटडाऊन होते. त्याआधी ६ जानेवारी १९९६ रोजी शटडाऊन झाले होते.

* २०१३ मध्ये शटडाऊनचा मोठा फटका बसला होता तेवढा आता बसू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अर्थसंकल्प व्यवस्थापन कार्यालयाचे व्यवस्थापक माइक मल्वेनाय यांचे म्हणणे आहे.

* शटडाऊनमध्ये लष्कर, अग्निशमन दलाचे कामकाज सुरू राहील. उद्यान विभाग चालू राहील, पण यातही जे लोक कामावर येणार आहेत त्यांना वेतन मिळणार नाही. टपाल विभाग सुरू राहणार आहे.

* यंदा प्रथमच प्रतिनिधिगृह व सिनेटमध्ये व व्हाइट हाऊसमध्ये एकाच पक्षाचे वर्चस्व असताना शटडाऊन झाले आहे.

यंदाचे शटडाऊन आम्ही वेगळय़ा पद्धतीने हाताळणार आहोत. आम्ही त्याचे शस्त्र होऊ देणार नाही. लोकांना त्रास होणार नाही याचा विचार केला जाईल. काँग्रेसच्या माध्यमातून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

माइक मल्वेनाय, संचालक अर्थसंकल्प व्यवस्थापन विभाग

ट्रम्प प्रशासनाच्या काळात अर्थव्यवस्था जोमात आहे. डेमोक्रॅट सदस्य शटडाऊनसारखे उद्योग करून आता ती थोपवू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांनी सरकार शटडाऊन करण्याचा प्रयत्न केला. हे शुमर शटडाऊन होते. आज रात्री त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा राजकारण महत्त्वाचे केले. लष्कर, वैद्यकीय सेवा सगळे धोक्यात आणले. असे केल्याने आम्ही बेकायदा स्थलांतरितांबाबत वाटाघाटी करू असे वाटत असेल तर तसे होणार नाही. डेमोक्रॅट्स सदस्यांनी नागरिकांना वेठीस धरले आहे. अडेलतट्टूपणाचे हे राजकारण आहे. अध्यक्ष ट्रम्प व त्यांचे प्रशासन अमेरिकी लोकांच्या हिताचे संरक्षण करण्यास समर्थ आहेत.

सारा सँडर्स, व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव

डेमोक्रॅटिक सदस्यांनी सरकारी निधी थांबवून ९० लाख बालकांचे आरोग्य धोक्यात आ णले असून अतिशय संवेदनाहीन पद्धतीने ते वागले आहेत. स्थलांतराचा प्रश्न हाताळण्यासाठी खर्च विधेयकात त्यांनी कोंडी करण्याची गरज नव्हती.

मिच मॅकॉनेल, सिनेटचे नेते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 1:17 am

Web Title: us government has gone into a partial shutdown
Next Stories
1 ट्रम्प प्रशासनाची वर्षपूर्ती – क्षणचित्रे
2 दिल्लीत प्लॅस्टिक गोदामाला आग; १७ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
3 भारतीय संविधान हेच सर्वोच्च सार्वजनिक धोरण- न्या. चेलमेश्वर
Just Now!
X