अमेरिकेतील टेक्सास येथे चर्चमध्ये गोळीबार करण्यात आला असून या घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोराची ओळख पटली असून डेविन कॅली (वय २९) असे या हल्लेखोराचे नाव आहे. गोळीबार करणाऱ्या डेव्हिनचाही मृत्यू झाला असून त्याने आत्महत्या केली की पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी सकाळी प्रार्थनेसाठी स्थानिक जमले होते. यादरम्यान डेविन चर्चमध्ये घुसला आणि त्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला. तर २० जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.

डेविन कॅली हा न्यू ब्रॉनफेल्स येथील रहिवासी असून तो यापूर्वी अमेरिकेतील हवाई दलाच्या तळावर कामाला होता अशी माहितीही समोर येत आहे. डेविन कॅलीचा दहशतवादी संघटनेशी संबंध नव्हता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. डेविनचे सोशल मीडियावरील अकाऊंट्सची तपासून बघत आहोत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोळीबारानंतर डेविन घटनास्थळावरुन पळून गेला होता. घटनास्थळापासून काही अंतरावर कारमध्ये डेविन मृतावस्थेत आढळला. डेविनने हा हल्ला केला, हे अजूनही अस्पष्ट आहे. जपान दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गोळीबाराची घटना धक्कादायक असून मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे’ असे त्यांनी सांगितले. हल्ल्यातील मृतांनाही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.