News Flash

पाकिस्तानशी शत्रुत्वाच्या बाबतीत अमेरिकेची भारतावर मात – सईद

पाकिस्तानशी असलेल्या शत्रुत्वाच्या बाबतीत अमेरिकेने भारतावर मात केली असून हा देश पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे नुकसान करू इच्छितो

| June 13, 2016 12:17 am

पाकिस्तानशी असलेल्या शत्रुत्वाच्या बाबतीत अमेरिकेने भारतावर मात केली असून हा देश पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाचे नुकसान करू इच्छितो, असे जमात-उद-दवा (जेयूडी) या संघटनेचा प्रमुख हाफीझ सईद याने म्हटले आहे.

अमेरिकेचे पाकबाबतचे शत्रुत्व भारतापेक्षा पुढे गेले आहे. अफगाण तालिबानचा प्रमुख मुल्ला अख्तर मन्सूर याला मारण्यासाठी त्याने बलुचिस्तानात ड्रोन हल्ले केले आणि त्याबाबत पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होते याचा अंदाज घेतला. अमेरिकेचे खरे लक्ष्य पाकिस्तानचा आण्विक कार्यक्रम असून, इस्रायल व भारताच्या मदतीने अमेरिका त्याचे नुकसान करू इच्छितो, असे जेयूडीची शाखा असलेल्या फलाह-ई-इस्नानियत फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना चौबुर्जी येथे संबोधित करताना सईद म्हणाला.

अमेरिकेने बलुचिस्तानात २१ मे रोजी केलेल्या ड्रोन हल्ल्यात मन्सूर मारला गेला होता. या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेल्या अमेरिकेच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाकडे पाकिस्तानने निषेध नोंदवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सईदने हे वक्तव्य केले आहे. या ड्रोन हल्ल्यांमुळे आपले ‘द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत’, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत अफगाणिस्तान व पाकिस्तानसाठीचे वरिष्ठ संचालक पीटल लॅव्हॉय आणि या दोन देशांसाठी विशेष प्रतिनिधी असलेले रिचर्ड ऑल्सन यांचा समावेश असलेल्या प्रतिनिधी मंडळाला पाकिस्तानने सांगितले होते.

अमेरिका, इस्रायल आणि भारत यांच्या पाकिस्तानविरोधातील भयंकर युतीबद्दल आपल्या देशवासीयांना माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे, असेही मुंबईवरील २००८ सालच्या दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेसाठी डोक्यावर १ कोटी अमेरिकी डॉलर्सचे बक्षीस असलेला हाफीझ सईद म्हणाला. आपल्या देशातील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी अमेरिकेकडून मदतीची अपेक्षा करणे थांबवावे, असे आवाहन त्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांना केले. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला लक्ष्य करण्यासाठी भारत त्याच्या विमानतळांवर क्षेपणास्त्र यंत्रणा बसवत आहे, असा आरोपही लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक असलेल्या सईदने केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2016 12:17 am

Web Title: us has moved ahead of india in its enmity with pakistan hafiz saeed
टॅग : Hafiz Saeed
Next Stories
1 पाकिस्तानात हिंदूला मारहाण करणाऱ्या पोलिसाला अटक
2 राजकीय कामकाजातील अडथळ्यांमुळे आर्थिक सुधारणांना विलंब – डॉ. अविनाश दीक्षित
3 कर्नाटकमध्ये जनता दलाकडून ८ आमदार निलंबित
Just Now!
X