देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्थिती गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. त्यामुळे करोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सल्ला अमेरिका प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस फौसी यांनी दिला आहे. डॉ. अँथनी एस फौसी बायडेन प्रशासनात मुख्य आरोग्य सल्लागार आहेत. त्यांनी अमेरिकेच्या सात राष्ट्राध्यक्षांसोबत काम केलं आहे.

“भारतात करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्स मिळत नाहीत. औषधांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे रुग्णांसोबत सामन्य जनता अडचणीत आली आहे. करोनाच्या विस्फोटामुळे भारतात यावेळी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे आता करोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे. तरच रुग्णसंख्या कमी होईल.”, असं मत डॉ. फौसी यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मांडलं.

करोना नव्हे मृत्यूची त्सुनामी! अवघ्या एका महिन्यात ४५,००० नागरिकांचा मृत्यू

“लसीकरण मोहीम आणखी वेगाने वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे करोनावर लगाम लावता येणार आहे. त्याचबरोबर भारतात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कमिशन गठीत करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करणं सोपं होईल”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

करोनाविरोधात आता भारतीय नौदलानं कसली कंबर! ‘ऑपरेशन समुद्र सेतू २’साठी युद्धनौका रवाना!

फेब्रुवारीमध्ये डोकं वर काढलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अवघ्या तीन महिन्यातच विध्वंसक परिस्थितीत ढकललं आहे. दररोज लाखो लोक करोनाच्या तडाख्यात सापडत असून, अनेक कुटुंबं उघड्यावर आली आहे. भयावह गोष्ट म्हणजे दुसऱ्या लाटेत मृतांचा आकडा प्रचंड वेगाने वाढला असून, फक्त एप्रिल महिन्याच्या ३० दिवसांत देशात ४५,००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आव्हान आहे.