वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाच्या चार महिला सदस्यांबाबत वंश,वर्णव्देषी ट्विट केल्याच्या प्रकरणी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारा ठराव प्रतिनिधिगृहात  मंजूर झाला.  ट्रम्प यांनी रविवारी ट्विट संदेश मालिकेत चार डेमोक्रॅटिक महिला सदस्यांना लक्ष्य करून त्यांना मायदेशी परत जा, असा खोचक सल्ला दिला होता.

रिपब्लिकन पक्षाचे विल हर्ड, सुसान ब्रुक्स, फ्रेड अ‍ॅप्टन, ब्रायन फिटझपॅट्रिक यांनी ट्रम्प यांचा निषेध करणाऱ्या ठरावाच्या बाजूने मतदान केले.  मंगळवारी ट्रम्प यांच्याविरोधात निषेधाचा  ठराव मांडण्यात आला होता त्यात पक्षीय पातळीवर मतदान होऊन २४० विरुद्ध १८४ अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे ट्रम्प यांच्या निषेधाचा ठराव हा चार रिपब्लिकन सदस्यांच्या पाठिंब्यासह मंजूर झाला. प्रतिनिधिगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. या बहुमताच्या ठरावाचा कुठलाही कायदेशीर परिणाम ट्रम्प सरकारवर होणार नाही पण तरीही हा ठराव संमत होणे ही ट्रम्प यांच्यासाठी नामुष्कीचे आहे.  डेमोक्रॅटिक पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्या अ‍ॅलेक्झांड्रिया ओकॅसिओ कोर्टेझ (न्यूयॉर्क), इलहन ओमर (मिनेसोटा), अयाना प्रेसले (मॅसॅच्युसेटस), रसीदा तालिब (मिशीगन) यांच्यावर ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून वर्णद्वेषी टिप्पणी केली होती.  काँग्रेसचे सदस्य टॉम मालिनोवस्की यांनी हा  ठराव मांडताना सांगितले की, येथे आम्ही कोण आहोत हा भाग वेगळा, पण अध्यक्षांनी जे शब्द वापरले त्यातून त्यांनी आगीशी खेळ केला आहे, त्यांनी जो संदेश पाठवला, ते जे बोलले ते सगळे अस्वस्थ मनाच्या, हिंसक वृत्तीच्या लोकांनी पाहिले व ऐकले आहे.