25 January 2021

News Flash

ट्रम्प यांच्याविरुद्धच्या महाभियोगासाठी बुधवारी प्रतिनिधिगृहात मतदान

वॉशिंग्टनमध्ये सत्ता हस्तांतरावेळी गैरप्रकार घडू नयेत यासाठी आणीबाणी जाहीर केली आहे.

(REUTERS/Leah Millis/File)

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांच्या मदतीने कॅपिटॉल हिल इमारतीत हिंसाचार घडवून आणल्याच्या आरोपावरून त्यांना पदच्युत करण्यासाठी महाभियोग कारवाईसाठी बुधवारी प्रतिनिधीगृहात मतदान होत आहे.

प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत असल्याने महाभियोगाच्या कारवाईचा प्रस्ताव मंजूर होण्याचीच शक्यता अधिक आहे. काँग्रेसचे सदस्य जेमी रसकीन व डेव्हिड सिसीलाइन तसेच टेड लिउ यांनी महाभियोग ठरावाची रचना केली असून त्याला २११ सदस्यांनी पाठिंबा दिला आहे.

प्रतिनिधीगृहातील बहुमताचे नेते स्टेनी हॉयर यांनी सांगितले की, बुधवारी महाभियोग कारवाईच्या प्रस्तावावर मतदान घेण्यात येईल. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यासाठी त्यांच्यावर ६ जानेवारी रोजी हिंसाचारास उत्तेजन दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल हिल येथे हिंसाचार केला होता. त्यानंतर प्रतिनिधी वृंदाच्या मतांची मोजणी काही काळ थांबवण्यात आली होती. या हिंसाचारात पाच जण ठार झाले होते. डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधीगृहात बहुमत असून सेनेटमध्ये रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांच्यात ५१-५० एवढीच तफावत असून दोन तृतीयांश सदस्यांचे मत हे महाभियोग कारवाईसाठी गरजेचे असते. बहुमताचे नेते मिच मॅकोनेल यांनी सांगितले की, वरिष्ठ सभागृहात २० जानेवारी म्हणजे बायडेन यांच्या शपथविधी आधी मतदान होऊ शकणार नाही.

वॉशिंग्टनमध्ये आणीबाणी

वॉशिंग्टन : कॅपिटॉल हिलमधील हिंसाचारास उत्तेजन देणारे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये सत्ता हस्तांतरावेळी गैरप्रकार घडू नयेत यासाठी आणीबाणी जाहीर केली आहे.

२० जानेवारी रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन यांचा शपथविधी होत आहे. सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात व्हाइट हाउसने म्हटले आहे की, अध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केली असून त्यामुळे अंतर्गत सुरक्षा मंत्रालय व संघराज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्था यांना कोणत्याही संभाव्य विपरित परिस्थितीत सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे अधिकार मिळाले आहेत. वॉशिंग्टन डीसी येथे सोमवार ते २४ जानेवारीपर्यंत आणीबाणी लागू राहणार आहे. गेल्या आठवडय़ात ट्रम्प यांच्या शेकडो समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीत घुसून हिंसाचार केला होता. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा तसे प्रकार होण्याची शक्यता टाळण्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. नियोजित अध्यक्ष जो  बायडेन व उपाध्यक्ष कमला हॅरीस यांचा शपथविधी २० जानेवारीला होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 3:42 am

Web Title: us house to vote on donald trump impeachment on wednesday zws 70
Next Stories
1 देशभरात लसपुरवठा !
2 रुबिया सईद अपहरणप्रकरणी आरोप निश्चित
3 ट्रम यांच्यावर कंपन्यांचाही बहिष्कार
Just Now!
X