मूळचे सौदी अरेबियाचे असलेले आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक करणार पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात गुप्तचर यंत्रणांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियाविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. खाशोगी यांची हत्या करण्याच्या कटाला सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच परवानगी दिली होती, असं गुप्तचर यंत्रणांनी अहवालात म्हटलं असून, बायडेन प्रशासनानं सौदीवर काही निर्बंध लादत, नागरिकांच्या व्हिसा बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार जमाल खाशोगी यांची २ ऑक्टोबर २०१८ मध्ये इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती. घटनेत सुरुवातीला मौन धरलं होतं. मात्र, त्यांची दूतावासात हत्या झाल्याचं नंतर समोर आलं होतं. या घटनेसंदर्भात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या परवानगीनेच खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती, असं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी पत्रकार जमाल खाशोगी यांना पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी इस्तंबुल, टर्कीमध्ये ऑपरेशन राबवण्यास मंजूरी दिली होती, असं अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं अहवालात म्हटलं आहे.

या खुलाशानंतर अमेरिकेनं सौदीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. बायडेन प्रशासनानं सौदीवर काही निर्बंध लादले असून, सौदी नागरिकांच्या व्हिसावरही बंदी घातली आहे. “पत्रकार आणि अमेरिकेचे कायदेशिर नागरिक असलेल्या जमाल खाशोगी यांच्या हत्येनं जग हादरलं होतं. आजपासून अमेरिकेचं नवीन धोरण असेल, जे लोक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या हल्ल्यात सहभागी असतील, त्याच्या व्हिसावर निर्बंध घातले जातील, असं अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी म्हटलं आहे.

अमेरिकेनं सौदीवर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्याबरोबरच नागरिकांच्या व्हिसावरही बंदी घातली आहे. मात्र, या निर्णयातून सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना वगळण्यात आलेलं आहे. खाशोगींच्या हत्येचा कटाला राजकुमारांनीच मंजूरी दिल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे.