मलेशियन एअरलाइन्सच्या एमएच३७० या बेपत्ता बोइंग विमानाचा शोध सर्व स्तरातून सुरू असतानाच आता अमेरिकन अन्वेषकांनी नवीनच तर्क लढवला आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या (एटीसी) रडारवरून गायब झाल्यानंतर हे विमान तब्बल चार तास हवेत उडत होते असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.    चीनने तर आपल्याला या विमानाचे अवशेष सापडल्याचा दावा केला परंतु मलेशियाने नंतर तो फेटाळून लावला.
क्लालालम्पूरहून बीजिंगच्या दिशेने झेपावलेले मलेशियन एअरलाइन्सचे बोइंग विमान उड्डाणानंतर तासाभरातच रडारवरून गायब झाले. गायब झाले त्यावेळी विमान व्हिएतनामी हवाईक्षेत्रात होते. बेपत्ता विमानाच्या बाबतीत गेल्या सहा दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विमानाच्या अपहरणापासून ते बॉम्बने ते उडवून देण्यापर्यंत सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आल्या आहेत.
१० देशांची डझनभर जहाजे व ४० विमाने बेपत्ता विमनाचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही या विमानाचा एकही अवशेष हाती लागलेला नाही. भारतानेही अंदमानच्या समुद्रात तीन युद्धनौका व हवाई दलाची दोन विमाने शोधकार्यासाठी तैनात केली आहेत. दरम्यान, अमेरिकी अन्वेषकांनी नवीनच तर्क लढवला आहे. एटीसीच्या रडारवरून गायब झालेले हे विमान त्यानंतर तब्बल चार तास हवेत उडत होते असा निष्कर्ष त्यांनी काढला असल्याचे वृत्त वॉल स्ट्रीट जनरलने दिले आहे.
विमानाच्या इंजिनातून आपोआप डाऊनलोड होणारा डेटा एटीसीकडे पाठवला जात असतो, त्याचाच हवाला या निष्कर्षांसाठी देण्यात आला आहे. मात्र, मलेशिया सरकारने हा निष्कर्ष फेटाळून लावला आहे.  
अमेरिकेच्या दाव्यावर आक्षेप
अमेरिकेचा हा निष्कर्ष चुकीचा असून आमच्याकडील माहितीनुसार उड्डाणानंतर एक तास विमानाकडून माहिती मिलत होती, परंतु एक वाजून सात मिनिटांनी ते बंद झाले व तीच अखेरची वेळ होती, असे काळजीवाहू वाहतूक मंत्री हशिमुद्दिन अहमद यांनी स्पष्ट केले.
आपल्या उपग्रहाला बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याचा चीनचा दावाही मलेशियाने खोडून काढला आहे. संबंधित ठिकाणी काहीही आढळले नसल्याचे मलेशियाच्या हवाई वाहतूक खात्याचे प्रमुख अझरुद्दिन रहमान यांनी स्पष्ट केले.
फ्लाइटकोड रद्द
बेपत्ता झालेल्या बोइंग विमानाचा एम३७० हा फ्लाइटकोड आता यापुढे न वापरण्याचा निर्णय मलेशियन एअरलाइन्सने घेतला आहे. क्वालालम्पूर ते बीजिंग व पुन्हा परतीचा प्रवास या हवाई सेवेला मलेशियन एअरलाइन्सने एमच३७० व एमच३७१ हा फ्लाइटकोड दिला होता. मात्र, दुर्घटनाग्रस्त विमानातील प्रवाशांना आदरांजली म्हणून हा फ्लाइटकोड रद्द करण्यात आला आहे. आता यापुढे क्लालाम्पूर-बीजिंग-क्वालालम्पूर या सेवेला एमच३१८ व एमच३१९ हा फ्लाइटकोड देण्यात येईल.