अमेरिका व इराण यांच्यादरम्यान ३० वर्षांच्या कालखंडानंतर ऐतिहासिक उच्चस्तरीय चर्चा करण्यात आली. इराणने प्रलंबित अणुकार्यक्रमाचा प्रश्न सोडवण्यासाठी काही शक्यता चर्चेसाठी पुढे ठेवल्या, मात्र अमेरिकेने इराणला तरीही केवळ बोलघेवडेपणा करून चालणार नाही असा सावधानतेचा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पी फाइव्ह प्लस वन बैठकीचे वर्णन सकारात्मक असे केले असून, इराणच्या अणुकार्यक्रमाचा प्रश्न सोडवण्यासाठी काही नवीन शक्यता सामोऱ्या आल्याचे सांगतानाच एखादी बैठक किंवा चर्चेतील तत्कालिक बदललेला नरमाईचा सूर याचा अर्थ सर्व प्रश्न सुटले असा होत नाही असा इशारा दिला.
केरी व इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांच्यासमवेत इंग्लंड, फ्रान्स, रशिया, चीन व जर्मनी या देशांचे परराष्ट्रमंत्री उपस्थित होते. पुढील महिन्यात या परराष्ट्रमंत्र्यांनी जीनिव्हात भेटण्याचे मान्य केले आहे. युरोपीय समुदायाच्या परराष्ट्र धोरण प्रमुख कॅथरिन अ‍ॅशटन यांनी सांगितले, की इराणने अण्वस्त्रे नष्ट करण्यासाठी साधारण बारा महिन्यांच्या कालावधीची मुदत अंदाजे ठरवण्यात आली आहे. अमेरिका व इराण यांच्यातील संबंध १९७९च्या इस्लामी क्रांतीनंतर तणावाचे बनले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांत चर्चा झाली. आमची चर्चा सकारात्मक झाली असून, परराष्ट्रमंत्री झरीफ यांनी इराणच्या वतीने चांगले सादरीकरण केले असून त्यांचा नूरही वेगळा होता, असे केरी यांनी सांगितले. आपल्या जनतेने आपल्याला मवाळ धोरण स्वीकारण्यासाठीच निवडून दिले आहे असा मुद्दा इराणचे अध्यक्ष हसन रोहानी यांनी मांडल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केरी यांना त्या दिशेने इराणशी वाटाघाटी सुरू करण्यास सांगितले होते.