यावर्षी ऑगस्ट महिन्यात इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणमध्ये एक ऑपरेशन केलं. या दोन्ही देशांच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणांनी अल-कायदाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या दहशतवाद्याचा शोधून काढलं व त्याला संपवलं. इराणची राजधानी तेहरानमध्ये अल-कायदाचा नंबर दोनचा दहशतवादी अबू मोहम्मद अल-मासरीची हत्या करण्यात आली, चार विद्यमान आणि एका माजी अमेरिकन अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अल-मासरी कुठे सापडेल? त्याची माहिती अमेरिकन इंटेलिजन्सने इस्रायलला पुरवली. त्यानंतर इस्रायलच्या एजंटन्सनी अल-मासरीला संपवलं अशी माहिती दोन अधिकाऱ्यांनी दिली. दोन अन्य अधिकाऱ्यांनी अल-मासरीच्या हत्येवर शिक्कामोर्तब केलं पण त्या ऑपरेशनबद्दल सविस्त माहिती द्यायचं टाळलं. केनिया, टंझानियामधील अमेरिकन दूतावासावरील हल्ल्याच्या स्मृतीदिनी सात ऑगस्टला अल-मासरीला संपवण्यात आले. १९९८ साली आफ्रिकेतील अमेरिकेच्या दोन दूतावासांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात त्याची भूमिका होती. असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

अल-मासरीकडे अल-कायदाचा सध्याचा म्होरक्या आयमन अल-झवाहीरीची उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. मोसादच्या ‘कीडॉन’ युनिटने केलेल्या ऑपरेशनमध्य अल-मासरी ठार झाला असे गुप्तचर यंत्रणेत काम करणाऱ्या या ऑपरेशनशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मोसाद ही इस्रायलची प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहे. मोसादने आतापर्यंत जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये अनेक धोकादायक ऑपरेशन्स केल्याची नेहमीच चर्चा होते. अल-मासरीची मुलगी मरीयमला सुद्धा संपवण्याचा प्लान होता. कारण अल-कायदामध्ये नेतृत्वासाठी तिला तयार केले जात असल्याची अमेरिकेची माहिती आहे.