करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी या आजाराच्या चाचण्या वेगवान गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठीच अमेरिकेतील एका प्रयोशशाळेने करोना व्हायरसच्या चाचणीसाठी एक मशीन बनवले आहे. नमुने चाचणीसाठी घेतल्यानंतर ही मशीन अवघ्या पाच मिनिटात रुग्ण करोना पॉझिटिव्ह असेल तर तसा रिपोर्ट देते. ही मशीन बनवणाऱ्या प्रयोगशाळेने हा दावा केला आहे. एनडीटीहीव्हीने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने इमर्जन्सीमध्ये मंजुरी दिल्याचे अबॉट लॅबोरेटरीजने म्हटले आहे. छोटया टोस्टरच्या आकाराचे हे मशीन आहे. मॉलीक्युलर टेक्नोलॉजीचा त्यामध्ये वापर करण्यात आला आहे. एखादा रुग्ण निगेटिव्ह असेल तर १३ मिनिटात कळते असे कंपनीने पत्रकात म्हटले आहे.

“COVID-19 विरोधात वेगवेगळया आघाडयांवर लढाई सुरु आहे. पोर्टेबेल मॉलिक्युलर टेस्टमुळे अवघ्या काही मिनिटात रिझल्ट मिळतो” असे अबॉटचे अध्यक्ष आणि मुख्य अधिकारी रॉबर्ट फोर्ड यांनी सांगितले. छोटया आकारमानामुळे हॉस्पिटल बाहेरही करोना व्हायरसची चाचणी सहज शक्य आहे असे फोर्ड म्हणाले.

अमेरिकेत सर्वाधिक गरज असलेल्या भागांमध्ये हे मशीन पाठवण्यात येईल. पोर्टेबेल मॉलिक्युलर टेस्टमशीनला अद्याप एफडीएकडून मान्यता मिळालेला नाही फक्त मान्यताप्राप्त लॅबना इमर्जन्सीमध्ये हे मशीन वापरण्याची परवानगी आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले.