अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांतील दोन प्रभावशाली खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून घोषित करण्यासाठी संसदेत एक विधेयक सादर केले आहे. पाकिस्तान धोकादायक देश असल्यामुळे त्यांना आर्थिक मदत बंद करण्याची वेळ आली आहे. दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून पाकिस्तानला घोषित केले पाहिजे, असे मत काँग्रेसचे सदस्य आणि संसदेच्या दहशतवादविरोधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन पक्षाचे के पो आणि डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य डाना रोहराबाचर यांनी ‘पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिझम डेजिगनेशन अॅक्ट’ सादर केला आहे. पो म्हणाले, पाकिस्तान विश्वासू सहकारी नाही. उलट त्यांनी अमेरिकेच्या शत्रूंची नेहमीच मदत केली आणि त्यांना वारंवार प्रोत्साहनही ते देतात. ओसामा बिन लादेन याला आपल्या देशात लपवले. तसेच हक्कानी नेटवर्कपर्यंतच्या सर्व बाबी पाकिस्तान दहशतवादाला कसा प्रोत्साहन देतो याचे पुरावेच आहेत. दहशतवादाविरोधाच्या लढाईत पाकिस्तान अमेरिकेबरोबर नक्कीच नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.