News Flash

तैवानी राजनैतिक अधिकाऱ्यावरील निर्बंध अमेरिकेकडून मागे

तैवान बाबत अमेरिकेने उचललेल्या या पावलामुळे चीन संतापला आहे.

| January 11, 2021 02:17 am

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ

वॉशिंग्टन/बीजिंग :अमेरिकी व तैवानी राजदूत आणि अधिकारी यांच्यातील संपर्कावर ‘स्वत:हून लादलेले निर्बंध’ अमेरिकेने उठवले असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी जाहीर केले आहे. चीनचे ‘तुष्टीकरण’ करण्याचे दीर्घकाळपासूनचे धोरण यामुळे संपुष्टात आले आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी या निर्णयाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

तैवान बाबत अमेरिकेने उचललेल्या या पावलामुळे चीन संतापला आहे. या देशाच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी रविवारी पॉम्पिओ यांच्यावर टीका केली. जो बायडेन हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष म्हणून २० जानेवारीला शपथ घेणार असतानाच, द्विपक्षीय संबंधांवर ‘आकसाने दीर्घकाळ टिकणारा व्रण लादण्याचा’ ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी पॉम्पिओंवर केला.

तैवान हा आपल्यापासून फुटून निघालेला प्रांत असून, वेळ पडल्यास बळाचा वापर करून तो मुख्य भूमीत सामील केला जायलाच हवा, अशी चीनची भूमिका आहे. मात्र आपले सार्वभौम राष्ट्र असल्याचे तैवानच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

‘आमचे राजदूत, राजनैतिक सेवेचे सदस्य व इतर अधिकारी यांच्या त्यांच्या तैवानी समपदस्थांशी असलेल्या संवादाचे नियमन करण्यासाठी गेली अनेक दशके आमच्या परराष्ट्र खात्याने गुंतागुंतीचे असे अंतर्गत निर्बंध निर्माण केले आहेत’, असे पॉम्पिओ यांनी शनिवारी एका निवेदनात सांगितले.

नागरी युद्धाच्या अखेरीस १९४९ साली तायवान चीनपासून वेगळा झाल्यापासून अमेरिकेने त्या देशाशी जवळचे संबंध राखले आहेत. मात्र चीनशी शत्रुत्व टाळण्यासाठी त्याने तैवानसोबतच्या मैत्रीचे मोठे प्रदर्शन करणे अलीकडच्या काळापर्यंत टाळले आहे.

ट्रम्प यांच्यावर स्वपक्षातूनच टीका

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तातडीने महाभियोग चालवण्यासाठी डेमॉक्रॅटिक पक्षाने सुरू केलेल्या नव्या मोहिमेला पाठिंबा मिळत आहे. याशिवाय, ट्रम्प समर्थकांच्या हिंसक जमावाने कॅपिटॉल इमारतीत केलेल्या भीषण दंगलीतील अध्यक्षांच्या भूमिकेबद्दल त्यांची खरडपट्टी काढली जायला हवी, असे मत रिपब्लिकन पक्षाच्याच एका वरिष्ठ लोकप्रतिनिधीने व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी ‘महाभियोग चालवण्यायोग्य गुन्हे’ केले असल्याचे आपल्याला वाटते, असे सिनेटर पॅट टूमी यांनी शनिवारी सांगितले. तथापि, महाभियोगाची कारवाई सुरू झाली, तर सेनेटमधील कार्यवाहीच्या निष्कर्षांतर आपण अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी मतदान करू काय, याबद्दल त्यांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 2:17 am

Web Title: us lifts self imposed restrictions on contacts with taiwan zws 70
Next Stories
1 ‘एनडीआरएफ’चे संयुक्त राष्ट्रांकडून प्रमाणीकरण
2 लसीमुळे मगर व्हाल म्हणणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचं मोदींना पत्र; म्हणाले, ‘आम्हाला दोन कोटी डोस तात्काळ द्या’
3 अंधार असल्यानं रस्ता चुकला; चीनकडून ‘त्या’ सैनिकाला सोडण्याची मागणी
Just Now!
X