अमेरिकेत वंशभेदातून भारतीयांवर हल्ल्यांचे सत्र सुरूच आहेत. फ्लोरिडामध्ये मुस्लिम समजून भारतीय वंशाच्या नागरिकाचे दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकाचे दुकान होते. शुक्रवारी सकाळी ६४ वर्षीय रिचर्ड लॉईड याने अरबी नागरिक समजून भारतीय वंशाच्या नागरिकाचे हे दुकान जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील अनर्थ टळला. लॉईडने दुकान जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुकान बंद होते असे पोलिसांनी सांगितले. हे दुकान मुस्लिम नागरिकाचे आहे असे वाटल्याने ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केला अशी कबुली रिचर्डने पोलिसांना दिली आहे. मला देशातून अरबी लोकांना हाकलून द्यायचे आहे असे रिचर्डने पोलिसांना सांगितले. रिचर्डने दुकान जाळण्यापूर्वी घटनास्थळाजवळअरबी लोकांनो परत जा अशा आशयाचे पत्रकही लावल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी रिचर्ड दुकान जळताना बघत होता. पोलिसांना बघून तो स्वतःच पोलिसांच्या दिशेने चालत गेला आणि ‘मला अटक करा’ असे सांगत त्याने गुन्ह्याची कबूली दिली. अमेरिकेच्या भल्यासाठीच मी हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रिचर्ड हा मनोरुग्ण आहे का याची तपासणीही केली जाणार असून तपासानंतरच हा ‘हेट क्राईम’चा प्रकार आहे का हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा एकदा अमेरिकेतील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमधील कॅंटमध्ये राहणारा ३९ वर्षीय दीप राय या शीख तरुणावर वंशभेदातून हल्ला झाला होता. तुमच्या देशात परत जा अशी धमकी देत त्याच्यावर गोळीबार झाला होता. सुदैवाने यात दीप राय किरकोळ जखमी झाला होता. त्यापूर्वी अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योजक हरनिश पटेल यांची लँकास्टरमध्ये हत्या झाली होती. तर कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या भारतीय तरुणाची वंशभेदातून हत्या झाली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us man tries to burn down store run by indian american in florida
First published on: 12-03-2017 at 09:20 IST