अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपुर्वी सीरियामधून आपलं सैन्य काढणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सीरियाच्या बंडखोरांच्या रासायनिक हल्ल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलल्याचं दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बोलताना २४ ते ४८ तासांच्या आत सीरियासंबंधी मोठा निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प गतवर्षीप्रमाणे यावर्षीही क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश देऊ शकतात असं म्हटलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियामधील निष्पाप लोकांची इतक्या निर्दयीपणे हत्या केल्याचा निषेध केला आहे. कथित हल्ल्यानंतर काही वेळानंतर ट्रम्प यांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष आसाद यांना जनावर म्हणत याची किंमत मोजावी लागले अशी धमकी दिली होते. गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन दिवसांच्या आत जेथून हल्ला झाला होता त्या एअरबेसवर क्षेपणास्त्र डागली होती.

जगातील अनेक लोकांनी आसद सरकारचा निषेध केला आहे. रशियाने मात्र कोणत्याही प्रकारचा रासायनिक हल्ला झाला नसल्याचा दावा केला आहे. सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डोमा शहरात रासायनिक हल्ला झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र रासायनिक हल्ल्यात १५० हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये अनेक लहान मुलंही सामील आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या तक्रारीनंतर ५०० हून जास्त लोकांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.

सोमवारी सीरियामधील सैन्य तळावर क्षेपणास्त्र हल्लादेखील झाला आहे. सुरुवातीला सीरियामधील मीडियाने या हल्ल्यामागे अमेरिका असल्याचा दावा केला. मात्र रशियान या हल्ल्यात इस्त्राइलच्या फायटर प्लेनचा हात असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यात जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला.