centcom-lअमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे(लष्कर) ट्विटर आणि यूट्यूब अकाऊंट इस्लामिक स्टेट(आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने सोमवारी दुपारी हॅक केले. दहशतवादी संघटनांविरोधात अमेरिकेच्या नेतृत्त्वात सुरू असलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘आयएसआयएस’ने ही कुरापत केली असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकन लष्कराचे ट्विटर अकाऊंट हॅक करून दहशतवाद्यांनी त्यास ‘सायबर जिहाद’ असे नाव दिले आहे. तसेच ‘आम्ही येतोय, परिणामांना सामोरे जाण्यास तयार रहा’ अशा आशयाचे चिथावणीखोर ट्विटस देखील या अकाऊंटवरून करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर, अमेरिकन लष्कराच्या महत्त्वाच्या अधिकाऱयांची यादी, दुरध्वनी क्रमांक आणि त्यांचे वैयक्तिक इमेल अशी संपूर्ण गुपित माहितीच दहशतवाद्यांनी ट्विटरवर जाहिर केली असून त्याच्या पावरपॉईंट स्लाईड देखील तयार केल्या आहेत. या सायबर हल्ल्यानंतर अमेरिकेने तातडीने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. केवळ प्राथमिक माहिती हॅकर्सच्या हाती लागली असून कोणतीही महत्त्वाची माहिती यामध्ये उघड झालेली नसल्याचे सांगत या प्रकरणावर योग्य कारवाई सुरू असल्याचे अमेरिकन लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे.