अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इंडोनेशियातील अमेरिकेचे राजदूत म्हणून रॉबर्ट ब्लेक यांची नियुक्ती केली आहे. दक्षिण आणि मध्य आशियातील कारभार मुख्यत्वे तेच पाहणार आहेत.
दक्षिण आणि मध्य आशियासाठी निशा देसाई बिस्वाल यांची उपमंत्री म्हणून नियुक्ती केल्यानंतर काही आठवडय़ांनी ओबामा यांनी ब्लेक यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. ब्लेक यांच्यासह अन्य सहा जणांची राजदूत म्हणून ओबामा यांनी नियुक्ती केली आहे.
अमेरिकेच्या दृष्टिकोनातून सध्या महत्त्वाचा कालखंड सुरू आहे आणि त्यावेळी या महनीय व्यक्तींची अमेरिकेच्या नागरिकांची सेवा करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, असे ओबामा यांनी म्हटले आहे. या महनीय व्यक्तींसमवेत यापुढील कालावधीत काम करण्याची आपली तीव्र इच्छा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ब्लेक यांनी यापूर्वी श्रीलंका आणि मालदीवचे राजदूत म्हणून काम पाहिले असून त्यानंतर त्यांची दक्षिण आणि मध्य आशियाच्या उपमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी म्हणजे २००३ मध्ये ब्लेक यांनी दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील उच्चपदस्थ अधिकारी म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य मागे घेतल्यानंतर अस्थिरता निर्माण झाल्यास तेथे दहशतवाद वाढेल, अशी भीती भारत आणि पाकिस्तानने व्यक्त केली असल्याचे अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटले आहे.
आगामी काळात भारत आणि पाकिस्तान हे देश अफगाणिस्तानात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतील, असा अमेरिकेला विश्वास असल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावतील, नव्हे त्यांना ती बजावावीच लागेल, असे आशिया-पॅसिफिक सुरक्षा व्यवहार संरक्षण उपमंत्री पीटर लेव्हॉय यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानात स्थैर्य आल्यानंतर तेथे दहशतवाद फोफावेल, अशी भारताला भीती वाटत आहे. हे दहशतवादी कोठे जातील, ते भारताला आपले लक्ष्य करतील का, असे प्रश्न पाकिस्तानातही उपस्थित केले जात आहेत, असे लेव्हॉय म्हणाले.