अमेरिकेच्या अणुभट्टय़ांना सुनामी व पुरापासून धोका असून त्यात सुधारणा करण्याची गरज आहे, असे जपानच्या फुकुशिमा दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेल्या पाहणी अहवालात म्हटले आहे. जपानच्या फुकुशिमा शहरात २०११ मध्ये अणुभट्टीत दुर्घटना घडून तिचा स्फोट झाला होता.
अमेरिकेतील अणुभट्टय़ांची रचना सुरक्षा मानकांप्रमाणे असून त्यात यंत्रणा कुठल्याही स्थितीला तोंड देऊ शकते हे खरे असले तरी अणुदुर्घटनांचा इतिहास पाहता फुकुशिमा दाइची, थ्री माईल आयलंड व चेर्नोबिव या अणुभट्टय़ांमध्ये जेव्हा अपघात झाले तेव्हा ते अणुभट्टय़ांच्या रचनेत असलेल्या दोषामुळे झालेले नाहीत तर त्यांची सुरुवात इतर कारणांमुळे झाली आहे.
अणु अभियंता व अहवालाचे लेखक जॉन गॅरिक यांनी म्हटले आहे की, नैसर्गिक दुर्घटना या मानवी चुका, विजेशी संबंधित बिघाड यामुळे होऊ शकतात व त्याचा फार मोठा परिणाम भौगोलिक क्षेत्रात होतो, पूर, सुनामी, भूकंप यामुळे अणुभट्टय़ांना फटका  बसतो.
 ‘लेसन्स लर्नड फ्रॉम  द फुकुशिमा न्यूक्लियर अ‍ॅक्सीडेंट फॉर इंप्रूव्हिंग द सेफ्टी ऑफ यूएस प्लांट्स’ हा अहवाल अमेरिकी काँग्रेसला सादर करण्यात आला.११ मार्च २०११ रोजी सुनामी व भूकंपामुळे फुकुशिमा दाईची प्रकल्पाची मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती, त्यातून किरणोत्सर्जनही झाले होते. जपानने ती दुर्घटना ज्या पद्धतीने हाताळली त्यात कुठलीही चूक नव्हती असे अहवालात म्हटले आहे, अणुप्रकल्प व अमेरिकी अणुनियंत्रकांनी ताजी वैज्ञानिक माहिती वापरून अणुभट्टय़ांच्या बाबतीत असलेली जोखीम टाळली पाहिजे असेही अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत १०० अणुभट्टय़ा असून त्यांची सुरक्षा अणु नियंत्रण आयोगाकडून बघितली जाते. अणुभट्टय़ांनी नैसर्गिक दुर्घटनांमुळे झालेली हानी व त्यानंतर १० मैलापर्यंत होणाऱ्या किरणोत्सर्जनाचे नियोजन करण्यासाठी आपत्कालीन योजना  आखल्या पाहिजेत असे अहवालात म्हटले आहे.