भारताला अण्वस्त्रांचा धाक दाखवू नका, अशा भाषेत अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा सुनावले आहे. उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचा संकेत दिल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन सहा ते सात दहशतवादी तळ उध्वस्त केली होती. भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ या कारवाईनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी गेल्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा भारतावर आण्विक मारा करण्याचे सुतोवाच केले. यापूर्वीही पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा यांनी भारताला धमकावले होते. आमच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही अणुवस्रे शोभेला खरेदी केलेली नाहीत, असे सांगत पाकिस्तान भारतावर अणुहल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे ख्वाजा यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. पाकिस्तानच्या या भूमिकेची अमेरिकेने नाराजी व्यक्त केली. अण्वस्त्र वापरामुळे जगातील शांतता व सुरक्षा यांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अणु शस्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचे ओबामा सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी देखील दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीचा वापर होऊ देण्यापासून रोखा, असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तानला दिला होता. तसेच अण्विक शस्त्रांच्या कार्यक्रमावर संयम ठेवावा असेही अमेरिकेने पाकिस्तानला बजावले होते.