अमेरिकेतील भारताच्या दूत देवयानी खोब्रागडे यांना चुकीच्या कारणांमुळे अटक करण्यात आल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. खोब्रागडे यांनी त्यांच्याकडील मोलकरणीच्या व्हिसासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करणाऱया अधिकाऱयाने चूक केल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली, असा युक्तिवाद त्यांचे वकील डॅनिअल अर्शाक यांनी केला.
राजनैतिक अधिकाऱयांच्या सुरक्षाविषयक कागदपत्रांची छाननी करण्याचे काम करणाऱया मार्क स्मिथ याने खोब्रागडे यांच्या कागदपत्रांची छाननी केली आणि त्यांना अटक केली. स्मिथ याने ‘डीएस-१६०’ या अर्जामधील माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा अर्शाक यांनी केला. परदेशातून आलेल्या मोलकरणीचा व्हिसा मिळवण्यासाठी या अर्जाचा वापर केला जातो. खोब्रागडे यांच्याकडील मोलकरीण संगीता रिचर्ड यांची या अर्जातील माहितीचा स्मिथ यांनी चुकीचा अर्थ लावला, असे अर्शाक यांनी म्हटले आहे. या अर्जामध्ये वेतनासंदर्भात दिलेल्या माहितीचाही स्मिथ याने चुकीचा अर्थ लावला, असेही अर्शाक यांनी स्पष्ट केले.
कागदपत्रांतील माहितीचा चुकीचा अर्थ लावून एखाद्याला मनस्ताप होईल, अशा पद्धतीची कृती करणे हा अतिशय गंभीर प्रकार असल्याचेही अर्शाक यांनी सांगितले.