अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट पाकिस्तानने लांबणीवर टाकली असून अफगाणिस्तानाबाबत नवे धोरण जाहीर करताना अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रयाबाबत जो निर्वाणीचा इशारा दिला होता, त्यावर काय प्रतिसाद द्यायचा हे कळत नसल्याने ही भेट लांबवण्यात आल्याचे समजते.

अमेरिकेच्या प्रभारी सहायक दक्षिण व मध्य आशिया कामकाज मंत्री व अफगाणिस्तान-पाकिस्तानसाठीचे प्रभारी विशेष प्रतिनिधी अलाइस वेल्स यांचा दौरा ठरला होता पण तो लांबणीवर टाकण्यात आला आहे. आता परस्परांना सोयीच्या वेळी हा दौरा होणार आहे.

परराष्ट्र खात्याने ही भेट लांबणीवर टाकण्याबाबत काही कारण दिलेले नाही. पण सरकारी सूत्रांनी सांगितले, की डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडे पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रयाबाबत जे आरोप केले होते त्यावर काय उत्तर द्यायचे हे अजून ठरवता आलेले नाही.

पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिला त्यामुळे अफगाणिस्तानातील तालिबानविरोधी युद्ध १६ वर्षे रखडले, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. त्यामुळे त्यावर ठोस उत्तर देता येत नसेल, तर अमेरिकेच्या मंत्र्यांशी संवाद साधणे फार घाईचे होईल, त्यामुळे श्रीमती अलाइस यांची भेट लांबणीवर टाकण्यात आली आहे.

अलाइस वेल्स यांचा दौरा लांबणीवर टाकण्यात आल्याच्या वृत्ताला अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दुजोरा दिला आहे. पाकिस्तान सरकारच्या विनंतीनुसार हा दौरा लांबणीवर टाकण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ट्रम्प यांनी नवीन अफगाण धोरण जाहीर केल्यानंतर पाकिस्तानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

दरम्यान अलाइस यांचा बांगलादेश व श्रीलंका दौरा मात्र उद्यापासून सुरू होत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असीफ हे चीन, रशिया व तुर्की दौऱ्यावर जाऊन त्या देशांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांनी बुधवारी सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांची भेट घेऊन अमेरिकेच्या नव्या अफगाण धोरणावर चर्चा केली.