रशियाने इराणला एस ३०० क्षेपणास्त्रे विकण्यावरचे र्निबध दूर केले त्याबाबत अमेरिकी संरक्षण खात्याने चिंता व्यक्त केली आहे. पेंटॅगॉनचे प्रवक्ते कर्नल स्टीव्ह वॉरेन यांनी सांगितले की, रशियाने इराणला क्षेपणास्त्रे विकण्यास आमचा पूर्वीपासून उघड विरोध आहे. हा प्रश्न राजनैतिक माध्यमातून आम्ही उपस्थित करीत आहोत.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणला क्षेपणास्त्रे विकण्यावरचे र्निबध उठवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे अण्वस्त्रांबाबत इराणने काही अटी मान्य केल्या तर रशिया इराणवरचे आणखी र्निबध उठवण्याची शक्यता आहे.
वॉरेन यांनी सांगितले की, पुतिन यांचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय र्निबधांच्या नियमाचे उल्लंघन आहे किंवा कसे हे अजून स्पष्ट झालेले नाही. आमचे वकील त्यात लक्ष घालतील. कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान अशा देशांना विकणे ही चिंतेची बाब आहे. रशिया ‘एस ३००’ प्रकारची क्षेपणास्त्रे इराणला विकणार असून त्याचा फायदा इराणला त्यांची अणुकेंद्रे हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी होणार आहे.
इस्रायल किंवा अमेरिका यांनी अशी भूमिका घेतली आहे की, इराणने अणुबॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया चालूच ठेवली तर हवाई हल्ले केले जाऊ शकतात. रशियाने २०१० मध्ये इराणला क्षेपणास्त्रे विकण्याचा करार केला होता पण र्निबधांमुळे ती देता आली नव्हती.