चीन-पाकच्या विरोधानंतरही अमेरिकेचे मत
अणुपुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नात चीन व पाकिस्तान मिळून खीळ घालत असतानाच, भारत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियमांची पूर्तता करत असून तो या गटात प्रवेशाकरिता तयार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
भारत हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण नियमांची (मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम) पूर्तता करत असून त्याला एनएसजीचे सदस्यत्व मिळू शकते असे अमेरिकेचे मत असल्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१५ सालच्या भारत दौऱ्याच्या वेळी म्हटले होते, याकडे मी लक्ष वेधू इच्छितो, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबी शुक्रवारी म्हणाले.
अणुपुरवठादार गटाचा (एनएसजी) सदस्य होण्याच्या भारताच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी चीन व पाकिस्तान यांनी हातमिळवणी केली आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात किरबी यांनी हे वक्तव्य केले. मात्र, नव्या सदस्याच्या या गटात प्रवेशाच्या शक्यतेबाबत विचारविनिमय हा विद्यमान सदस्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, नॉन- प्रोलिफेरेशन ट्रीटी (एनपीटी) करारावर स्वाक्षरी करणे हा एनएसजीच्या विस्तारीकरणाचा ‘महत्त्वाचा’ निकष असल्याचे ४८ देशांच्या या गटातील बहुतेक सदस्यांचे मत होते, असे सांगून अणुपुरवठादार गटात (एनएसजी) भारताचा प्रवेश रोखण्याच्या आपल्या कृतीचे चीनने समर्थन केले आहे.
आंतरराष्ट्रीय आण्विक अप्रसार नियमांचे रक्षण करण्यासाठी आण्विक अप्रसार करार (न्यूक्लिअर नॉन- प्रोलिफेरेशन ट्रीटी – एनपीटी) ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे केवळ चीनच नव्हे, तर एनएसजीच्या अनेक सदस्यांचे मत आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या एनएसजीमध्ये प्रवेशाचा मुद्दा भारताच्या प्रयत्नांशी जोडून चीन त्यासाठी जोमाने प्रयत्न करत असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता लु म्हणाले, की एनएसजी हा एनपीटीचा महत्त्वाचा भाग असून, आंतरराष्ट्रीय समुदायाची त्याबाबत बऱ्याच काळापासून एकवाक्यता आहे. भारत हा एनएसजीचा भाग नसला, तरी या सहमतीला भारतही मान्यता देतो, असा दावा त्यांनी केला.