पाकिस्तानला अमेरिकेचा इशारा

अमेरिकी पत्रकार  डॅनियल  पर्ल यांचा ते पाकिस्तानात वार्तांकनासाठी गेले असताना शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तींना शिक्षा करण्यात यावी, यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकेन यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

पर्ल यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या  सर्व दहशतवाद्यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. डॅनियल पर्ल खून प्रकरणातील या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, असे ब्लिंकेन यांनी कुरेशी यांना ठणकावून सांगितले आहे. पर्ल (वय ३८) हे दी वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया प्रमुख होते. त्यांचे अपहरण करून  शिरच्छेद करण्यात आला होता. २००२ मध्ये पाकिस्तानमध्ये आयएसआय व अल कायदा यांच्या संबंधांचा शोध घेण्यासाठी पर्ल गेले होते. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितले, की पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पर्ल यांच्या मारेक ऱ्यांची मुक्तता करण्याचा निकाल दिला आहे. त्याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकेन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. पर्ल यांच्या अपहरण व हत्येस अहमद ओमर सईद शेख व इतर काही जण जबाबदार आहेत.