अमेरिकेतील अॅरिझोना येथे उबरच्या स्वयंचलित कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामुळे स्वयंचलित कारच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अॅरिझोनात उबरच्या स्वयंचलित कारने रविवारी मध्यरात्री रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, उबरच्या स्वयंचलित कारने धडक दिल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. गाडी स्वयंचलित असली तरी चाचणीच्या वेळी गाडीत चालक असायलाच हवा, असा नियम आहे. यानुसार कारमध्ये चालक होता, अशी माहिती देखील समोर येत आहे. पोलिसांनी या अपघाताविषयी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही. उबरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही या अपघाताप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करत आहोत’, असे उबरने स्पष्ट केले. या अपघातानंतर उबरने उत्तर अमेरिकेतील स्वयंचलित कारच्या चाचणीला स्थगिती दिली आहे.

उबरच्या स्वयंचलित कारला अपघात झाल्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मार्च २०१७ मध्येही अ‍ॅरिझोना प्रांतातच उबरच्या स्वयंचलित कारला अपघात झाला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, तेव्हापासून स्वयंचलित कारच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्वयंचलित गाडीचा पहिला प्रयोग १९८४ मध्ये पार पडला होता. परंतु तिचा व्यावसायिक वापर करण्याचा प्रयोग अलीकडेच झाला. २०१६ मध्ये उबर कंपनीने स्वयंचलित कारचे तंत्रज्ञान विकसित करणारी ओट्टो ही कंपनी खरेदी केली होती.