ताजमहालाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या परिसरात चिलखती आवरण असलेल्या कोणत्याही वाहनाला प्रवेश न देण्याची उत्तर प्रदेश पोलीसांची भूमिका बराक ओबामा यांचा आग्रा दौरा होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारमधील काही सूत्रांकडून ‘द इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राला ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशांनुसार, पर्यटकांना ताजमहालपासून ५०० मीटर अंतरावर असणाऱ्या शिल्पग्राम संकुलाजवळ उतरावे लागते, त्यानंतर तेथून एका इलेक्ट्रीक गाडीच्या सहाय्याने पर्यटकांना ताजमहालापर्यंत आणले जाते. मात्र, ओबामा यांच्याबाबतीत अशाप्रकारचा कोणताही धोका पत्कारण्याची अमेरिकी सुरक्षा यंत्रणांची तयारी नाही. बराक ओबामांची विशेष सुरक्षा सुविधा असलेली गाडी आणि त्यांच्याबरोबर सुरक्षेसाठी असणाऱ्या तब्बल ५० गाड्यांच्या ताफ्याला ताजमहालच्या परिसरात प्रवेश देण्यास उत्तर प्रदेश सरकारने नकार दिला. प्रवेश हवा असल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून तशाप्रकारच्या परवानगीचे पत्र आणण्यास उत्तर प्रदेश सरकारकडून परराष्ट्र मंत्रालयाला सांगण्यात आले. मात्र, इतक्या कमी वेळात हे शक्य नसल्याचे परराष्ट्र खात्याच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.  अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्यासह ताजमहालाला भेट देणार होते.