पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही अत्यंत भयानक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण यासंबंधीचे सर्व रिपोर्ट्स तपासत असून याप्रकरणी लवकरच एक स्टेटमेंट जारी करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

याव्यतिरिक्त अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता रॉबर्ट पालाडिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला पूर्ण समर्थन दिलं असून या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास पाकिस्तानला सांगितलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये संबंध ताणले गेले असून डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना दक्षिण आशियातील दोन्ही शेजारी देश एकत्र आले तर फार चांगलं होईल असं म्हटलं आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी एका प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘मी पाहिलं आहे. मला अनेक रिपोर्ट्सही मिळाले आहेत. योग्य वेळी मी यावर प्रतिक्रिया देईन. जर पाकिस्तान आणि भारत एकत्र आले तर ही फार चांगली गोष्ट असेल’. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘पुलवामा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक परिस्थिती होती. आम्हाला रिपोर्ट्स मिळत आहेत. आम्ही यासंबंधी स्टेटमेंट जारी करु’.

एका दुसऱ्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अमेरिका भारत सरकारच्या संपर्कात असून फक्त शोक व्यक्त केलेला नाही तर पाठिंबाही दिलेला आहे. आम्ही पाकिस्तानला तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन करत आहोत. सोबतच हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जावी’. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका भारतासोबत पाकिस्तानच्याही संपर्कात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टॉन यांनी भारताकडे स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे.