अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची मे महिन्यात भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग इयू योंग यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना या संदर्भातली माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांची भेट मे महिन्यात होईल अशी माहिती योंग यांनी दिली. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांनी आत्तापर्यंत वारंवार आण्विक हल्ला करण्यासंदर्भात धमक्या दिल्या आहेत. मात्र आता ते अशा प्रकारच्या धमक्या देणार नाहीत किंवा अण्वस्त्र चाचणीही करणार नाहीत त्या मुद्द्यावर ते शांत झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्याचमुळे डोनाल्ड ट्रम्प हे किम जोंग यांना भेटण्यासाठी तयार झाले आहेत.

पहिल्यांदाच होणाऱ्या यू.एस. नॉर्थ कोरिया परिषदेसाठी किम जोंग यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारले असून ते किम जोंग यांची मे महिन्यात भेट घेतील अशी माहिती व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या सराह सँडर्स यांनी दिली आहे. उत्तर कोरिया अण्वस्त्र चाचणी न करण्यावर राजी झाला झाला आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे क्षेपणास्त्रही त्यांच्याकडून चालवले जाणार नाही, असेही सँडर्स यांनी म्हटले आहे.

मागील वर्षभराचा विचार करता या दोघांनीही अण्वस्त्र हल्ल्याची धमकी एकमेकांना दिली आहे. तसेच या दोघांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात युद्ध होते की काय? अशी भीतीही यामुळे निर्माण झाली होती. मात्र मे महिन्यात हे दोन नेते एकमेकांना भेटत आहेत. त्यामुळे त्यांच्यात होणाऱ्या चर्चेतून शांततापूर्ण मार्गच निघेल अशी अपेक्षा आहे असेही सँडर्स यांनी म्हटले आहे. अमेरिकेवर अणू हल्ला करण्याची धमकी किम जोंग यांनी दिली होती. त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते. आता या दोघांच्या भेटीकडे जगाचे लक्ष असणार आहे.