अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मुलाने १५ मिनिटांत करोनावर मात केली असल्याचा दावा केला आहे. १५ मिनिटांत करोना विषाणू नष्ट झाले होते असं ते म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पेन्सिल्व्हेनिया येथील मार्टिन्सबर्ग येथे आयोजित प्रचारसभेत बोलत असताना हा दावा केला. डेली मेलने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना करोनाची लागण झाली होती. यासंबंधी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला १४ वर्षीय मुलगा बॅरन यालाही करोना झाला असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी बॅरन तरुण असून रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचा उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी मुलाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांसोबत झालेल्या संभाषणाची माहिती दिली. “मी डॉक्टरांना बॅरनच्या प्रकृतीविषयी विचारलं असता त्यांनी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. १५ मिनिटांनी पुन्हा जेव्हा मी डॉक्टरांना बॅरनच्या प्रकृतीविषयी विचारलं तेव्हा त्यांनी करोना निघून गेला असं सांगितलं”. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील शाळा पुन्हा एकदा सुरु करण्याचा विचार करत आहेत. मात्र अनेक राज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेला विरोध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रचारसभेत आपल्या मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीचा उल्लेख करत लोकांना शाळा सुरु करण्यात कोणतीही अडचण नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.