अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला परदेश दौरा ठरला आहे. ट्रम्प या महिन्यात सौदी अरेबिया आणि इस्त्रायलच्या दौऱ्यावर जाणार असून आयसिसविरोधातील मोहीमेच्या दृष्टीने ट्रम्प यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात पहिल्या परदेश दौऱ्याची घोषणा केली. ‘मला माझा पहिल्या आणि ऐतिहासिक परदेश दौऱ्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. मी या महिन्यात सौदी अरेबिया, इस्त्रायल आणि मग तिथून रोममध्ये जाणार आहे’ असे ट्रम्प यांनी सांगितले. रोममध्ये ट्रम्प हे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतील.

ट्रम्प हे सौदी अरेबियातील रियाधमध्ये जगभरातील मुस्लिम नेत्यांना एकत्र आणून बैठ घेतली. या बैठकीच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम मित्र राष्ट्रांना एकत्र आणून दहशतवाद, कट्टरतावादाविरोधात लढा देण्याचा तसेच मुस्लिम तरुणांसाठी चांगले भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले. दुसऱ्यांनी कसे जगावे यावर आमचा अधिकार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधातील मोहीम, इराणविरोधातील मोर्चेबांधणी आणि मध्य पूर्वेतील शांततेच्या दृष्टीने ट्रम्प यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी परदेश दौऱ्यावर आत्तापर्यंत फारसा भर दिलेला नव्हता. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर चार महिन्यांमध्ये तीन परदेश दौरे केले होते. यात त्यांनी नऊ देशांना भेट दिली होती. त्यातुलनेत ट्रम्प यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्येही जाणे टाळले आहे. एप्रिलमध्ये महिन्यात ट्रम्प यांनी कॅनडच्या पंतप्रधानांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. पण त्यानंतरही दोन्ही देशांमधील व्यापारसंबंध तणावपूर्णच होते.

माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात इस्रायला व अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांनी पूर्व जेरुसलेम व पश्चिम किनारा भागात केलेल्या वसाहती बेकायदा ठरवण्याबाबत मांडलेल्या ठरावावर अमेरिका तटस्थ राहिली होती. पण ट्रम्प यांनी इस्त्रायलसोबत संबंध सुधारण्यावर भर दिल्याचे दिसते. ट्रम्प हे ब्रुसेलमध्ये २५ मे रोजी होणाऱ्या नाटो राष्ट्राच्या बैठकीत तसेच सिसीलीमध्ये ग्रुप सेव्हन समिटमध्येही सहभागी होती. याच दौऱ्याच्या वेळी ते सौदी आणि इस्त्रायलमध्ये जातील असे समजते.