कर सुलभता, अमेरिकी तरुणांना नोकऱ्या देण्याची उद्दिष्टे

अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन, कर सुलभता, अमेरिकी तरुणांना नोकऱ्या अशी भरगच्च उद्दिष्टे असलेल्या आर्थिक पुनरुत्थानासाठीच्या तीन आदेशांवर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. अध्यक्षपदावर आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांत ट्रम्प यांनी आश्वासनांची पूर्तता करण्याचा धडाका सुरू केला आहे.

अत्यंत महत्त्वाचा असा हा आदेश असून त्यात डॉड-फ्रँक कायद्यातील काही तरतुदींचा फेरविचार करण्यात आला आहे. या प्रक्रियेला सहा महिने लागणार असून, त्यात एकूण तीन आदेश जारी करण्यात आले आहेत. हा कायदा बराक ओबामा यांच्या काळात २००८ मध्ये आर्थिक पेचप्रसंगानंतर करण्यात आला होता. ट्रम्प हे अर्थ मंत्रालयात गेले व तेथे त्यांनी आर्थिक पुनरुत्थानाच्या आदेशावर स्वाक्षरी केली, त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था सुधारून रोजगाराच्या संधी बाहेरच्या लोकांना मिळणार नाहीत. आता आम्ही अमेरिकेची फेरबांधणी करीत आहोत व नवा आशावाद देशात आहे जो गेली अनेक दशके दिसत नव्हता. आता आम्ही आर्थिक बाजू पुन्हा भक्कम करणार आहोत असे ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी करताना सांगितले. अर्थमंत्री स्टीव्हन मुशिन यांना या आदेशानंतर कर सुलभता आणावी लागणार आहे. ट्रम्प यांनी सांगितले, की हा आदेश म्हणजे मोठी बाब आहे. लोक कर विवरणपत्रे भरू शकत नाहीत कारण ती किचकट आहेत. आता त्यात सुलभता आणली जात असून कर कमी केले जातील, त्याचा फायदा मध्यमवर्गीयांना होईल. व्यावसायिकांवरील कर कमी होतील. कंपन्यांवरचे कर अमेरिकेत जास्त आहेत त्यामुळे उत्पादकता व संपत्ती यावर मर्यादा आल्या आहेत. दुसऱ्या एका आदेशात ट्रम्प यांनी डॉड-फ्रँक र्निबधात सुधारणा करून वॉल स्ट्रीट आस्थापनांना उत्तरदायी ठरवण्यात अपयशी ठरलेले घातक नियम काढायला सांगितले आहे. या आस्थापनांनी जे करायला पाहिजे त्याच्या नेमके उलटे आतापर्यंत केले आहे. आधीच्या र्निबधामुळे उलट जोखमीचे वर्तन केले जात होते. अर्थव्यवस्था अधिक कणखर करण्याकडे आमचा कल आहे. आम्ही आता लहान व्यावासायिक, उद्योगपती, महिला उद्योजक यांना कर्ज देणार आहोत. देशाच्या प्रत्येक भागात सर्वाना सारखी संधी मिळाली पाहिजे असे ट्रम्प यांनी सांगितले. कर व्यवस्था किचकट असल्याने अमेरिकेत ६.१ अब्ज तास हे त्यावर जात होते व त्याचा खर्च २३० अब्ज डॉलर्स होता, त्यामुळे करव्यवस्था सुलभ करणे गरजेचे होते असे मुशिन यांनी सांगितले.